– पीकविमा काढतांना घरापर्यंत येता, विमा देतांना टाळाटाळ का?; शेतकर्यांच्या सवाल
चिखली (महेंद्र हिवाळे) – शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांच्या नेतृत्वात शेतकर्यांनी कृषी विभाग व पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. रब्बी हंगामातील पीकविम्यापासून टाकरखेड मुसलमान येथील शेतकर्यांसह जे शेतकरी वंचित राहिले आहेत, त्यांचाही विमा दिला जाईल, असे आश्वासन पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींनी दिल्यानंतर व याप्रश्नी कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, पीकविमा काढण्यासाठी घरापर्यंत येता, आणि पीकविमा नुकसान भरपाई देताना टाळाटाळ करता, अशा शब्दांत संतप्त शेतकर्यांनी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीला ठणकावले.
खरीप २०२३-२४मध्ये सोयाबीनसह इतर पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. तेव्हा टाकरखेड मु येथील ३९० शेतकर्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यापैकी केवळ ३१ तक्रारी कंपनीने मान्य केल्या तर विविध कारणे ३५९ तक्रारी अपात्र असल्याचे समोर आले आहे. तर हिच परिस्थिती तालुक्याची असल्याने पीकविमा कंपनीकडून विमा काढतांना मार्गदर्शन होते. परंतु विमा मिळवून देण्यासाठी शेतकर्यांना मार्गदर्शन होत नाही, अशा तक्रारी शेतकर्यांनी केल्या तर शेतकर्यांचे नैसर्गिक आपत्तीचे नुकसानीचे पंचनामे ग्राह्य धरून पीकविमा तक्रारी करणार्या शेतकर्यांना सरसकट पीकविमा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
कृषी विभागाच्या योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्याची मागणी
कृषी सहाय्यक शेतकर्यांपर्यंत योजना पोहोचवत नसल्याने त्या प्रकरणी चौकशी व्हावी व कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. या प्रकरणी कृषी सहाय्यक यांना सूचना देण्यात येवून शेतकर्यांपर्यंत सर्व कृषीविषयक योजना पोहोचवण्यासाठीची कारवाई करण्याचे आश्वासन तालुका कृषी अधिकारी सवडदकर यांनी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांना दिले आहे.
संगणक परिचालकाची बीडीओकडे तक्रार
टाकरखेड येथील संगणक परिचालक योजनेची माहिती शेतकर्यांना देत नाही. आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याने या प्रकरणी तक्रार गटविकास अधिकारी यांना देण्यात आली असून, या प्रकरणी योग्य कारवाई करण्याच्या सूचना पंचायत समिती कार्यालयाकडून ग्रामपंचायत सचिव यांना देण्यात आल्या आहेत.

