– जखमींना चिखली येथे हलविले, वैद्यकीय उपचार सुरू!
मेरा बुद्रूक, ता. चिखली (एकनाथ माळेकर) – तांबोळा येथून असोल्याकडे परत येणार्या अॅपे रिक्षाला वनभागातून भरधाव आलेल्या रोही प्राण्याने धडक दिल्याने भरधाव असलेली ही अॅपे पलटली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना चिखली येथे हलविण्यात येत असताना, त्यापैकी एका महिलेचा रूग्णवाहिकेत जीव गेला. तर एक महिला अत्यवस्थ आहे. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर चिखली येथे उपचार सुरू आहेत. आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अंढेरा फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. सुज्ञ नागरिकांनी वेळीच धाव घेऊन मदतकार्य केल्याने बळींची संख्या वाढू शकली नाही.
या दुर्देवी अपघाताची माहिती मिळताच चिखलीकडे जाणारे दत्तकृपा स्टोन क्रेशरचे मालक पद्माकरशेठ दंडे व संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे शिवानंद मान्टे, विष्णू वाघ पिंपरी व विशाल तेजनकर, रवींद्र सानप, अॅपे संघटनेचे सुशील इंगळे, बंडू राठोड यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदतकार्य केले. शिक्षक मान्टे यांनी तातडीने रूग्णवाहिका बोलावल्या त्यामुळे जखमींना चिखलीला लगेचच हलवण्यात मदत झाली. रोही प्राण्याने जबरदस्त धडक दिल्याने या अॅपेचा चक्काचूर झाला असून, घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात या महिला पडल्या होत्या. मात्र मदतीला धावून आलेल्या नागरिकांनी वेळीच मदत केल्यामुळे लवकर उपचार मिळाल, हे विशेष. वन विभागाने या मार्गावरील आपल्या हद्दीमध्ये प्राण्याचे फोटो लावून सूचनाफलक निर्माण करून लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याप्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

