बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राच्या रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी जिल्ह्यात २३ नवीन मतदान केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मतदान केंद्रामुळे जिल्ह्यात आता २ हजार २८८ मतदान केंद्र असणार आहे. तसेच कुटुंबातील सर्व मतदारांची नावे एकाच मतदान केंद्रावर असणार आहेत. गत लोकसभा निवडणुकीला जिल्ह्यात २ हजार २६५ आणि १ सहायकारी मतदान केंद्र असे एकूण २ हजार २६६ मतदान केंद्र होती. यात आता २३ नवीन मतदान केंद्राची वाढ होऊन २ हजार २८८ मतदान केंद्र असणार आहेत.
सुधारीत, नवीन प्रस्तावाच्या अनुषंगाने विधानसभा आणि जिल्हास्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीमध्ये उपस्थित सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी यांचेकडून सहमती घेवून सदरचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात आले. यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नवीन, विलीनीकरण, स्थलांतरण आणि नावात बदल झालेल्या मतदान केंद्रांमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय मलकापूर ३०५, बुलढाणा ३३७, चिखली ३१७, सिंदखेडराजा ३४०, मेहकर ३५०, खामगाव ३२२, जळगाव जामोद ३१७ अशी एकूण मतदान केंद्रांची संख्या राहणार आहे. बदल झाल्यानंतर अद्यावत विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन मतदान केंद्रांची यादी सर्व मतदार नोंदणी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध राहणार आहे. या यादीची नागरीकांनी पडताळणी करून मतदानकेंद्राविषयी माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
———
सुधारीत वेळापत्रकानुसार प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध
भारत निवडणूक आयोगाने दि. १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांच्या दुसर्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या सुधारीत वेळापत्रकानुसार दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप मतदारयादी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्धीनंतर सर्व विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्तरावर प्राप्त दावे आणि हरकती निकाली काढल्यानंतर अंतिम मतदारयादी दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. २३ जानेवारी ते ६ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ३८ हजार ४०४ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. तसेच ६ हजार २३७ मतदारांची नावे वगळली असून १८ हजार ३३१ मतदाराच्या तपशीलामध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे. नोंदणी आणि वगळणीनंतर प्रारूप मतदार यादीमध्ये १० लाख ८४ हजार ९३५ पुरूष मतदार, ९ लाख ८९ हजार ३२४ महिला मतदार, ३३ तृतीयपंथी असे एकूण २० लाख ७४ हजार २९२ मतदार आहेत. यात १४ अनिवासी भारतीय, १६ हजार ९६८ दिव्यांग मतदार, तर १८ ते १९ वयोगटातील एकूण ३४ हजार ५८१ मतदार प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत.
———–

