मलकापुरातील भाजप पदाधिकारी शिवा तायडेची पोलिस ठाण्यातच महिलेला मारहाण!

breakingmah 2 Min Read
2 Min Read
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी शिवा तायडे याने एका महिलेला पोलिस ठाण्यातच मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ शिवसेना (ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. व्हिडिओत मारहाण करणारा शिवा तायडे हा भाजपचा स्थानिक पदाधिकारी असून, तो मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आहे. त्याच्यावर पोलिस ठाण्यातच एका महिलेला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

https://x.com/i/status/1821030674297475193

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी भाजपसह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचा स्थानिक पुढारी तथा मलकापूर जिल्हा बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती शिवा तायडे या गावगुंडाने शहरातील पोलिस ठाण्यातच एका महिलेला मारहाण केली. थोर ते गृहमंत्री व थोर ते पोलिस कर्मचारी, असे सुषमा अंधारे यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विट करताना म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत दिसून येत आहे की, पोलिस ठाण्यातील एका बाकड्यावर एक महिला एका तरुणासोबत बसलेली आहे. भाजप पदाधिकारी शिवा तायडे अचानक या खुर्चीवरून उठून या महिलेकडे येतो आणि तिला मारहाण करतो. यावेळी अन्य एक महिला व पोलिस कर्मचारी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात. पण शिवा तायडे या सर्वांना बाजूला सारून सदर महिलेला मारहाण करतो. एवढेच नाही तर सदर महिलेच्या बचावासाठी धावलेल्या दुसर्‍या महिलेलाही ते मारहाण करताना व्हिडिओत दिसून येत आहेत. सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर सोशल मीडियात संतापाची लाट उसळली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घटना उघडकीस आल्याने त्याचा बुलढाण्यासह राज्यात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Share This Article
Exit mobile version