– मला सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्याचा नीलेश लंकेंचा गौप्यस्फोट; विजय आपलाच असल्याचा दावा!
शेवगाव/नगर (बाळासाहेब खेडकर) – मला लोकसभेच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी मदत केली असल्याने मी सर्वपक्षीय कार्यकर्ता असून, सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्यांनी निवडणुकीनंतर आकसबुद्धीचे राजकारण करून कार्यकर्त्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ते त्यांनी करू नयेत, अन्यथा ४ जूननंतर सर्व हिशोब चुकता केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा खणखणीत इशारा अहमदनगर लोकसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी दिला आहे. शेवगाव तालुक्यातील कोनोशी येथे युवानेते राजेंद्र दौंड यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नीलेश लंके बोलत होते.
आमच्यावर सातत्याने गुंडगिरीचा आरोप केला जात आहे, पण आम्ही गुंड नाहीत तर गरिबाला छळणारांचा बंदोबस्त करून गुंडगिरी थांबविण्यासाठी प्रयत्न केला आहे. मी कमी शिक्षित, इंग्रजी येत नाहीं, असा आरोप झाला. पण मी आयटीआयचा साध फिटर आहे. कोणता पान्हा कसा लावायचा याचा खटका मला माहित आहे, ते आपणनास दिसून येईल, असा टोलाही लंके यांनी सुजय विखे यांना लगावला.
महसूल व पोलीस यंत्रणा कोण चालवतो हे पाहावे लागेल…!
शेवगाव तालुक्यासह मतदारसंघात खतपाणी घालून सामान्य कार्यकर्त्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे उद्योग सुरू आहेत. भविष्यात सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, तसेच महसूल व पोलीस यंत्रणा कोण हाताशी धरून चालवतो ते भविष्यात पहावे लागेल, तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे नीलेश लंके यांनी याप्रसंगी आवर्जुन सांगितले.
———–

