विम्याच्या एक कोटीसाठी तिने नवरा सुपारी देऊन मारला!

editor 2 Min Read
2 Min Read

बीडच्या पिंपरगव्हाण येथील पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना

बीड/ जिल्हा प्रतिनिधी
पैशासाठी हपापलेल्या पत्नीने सुपारी देऊन पतीचा काटा काढला. एक कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी पत्नीने थंडडोक्याने हा खून घडवून आणला. मारेकर्‍यांनी डोक्यात टामीने मारून हत्या केल्यानंतर, अपघात घडल्याचे दाखवले खरे मात्र बीड पोलिसांनी शिताफीने तपास करुन या सिनेस्टाइल खुनाचा उलगडा केला.मंचक गोविंद पवार (४५) रा.वाला ,ता. रेणापूर जि. लातूर, हमु, अंकुशनगर, बीड असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
११ जून रोजी पहाटे मंचक पवार यांचा मृतदेह अहमदनगर महामार्गावरील बीड पिंपरगव्हाण रस्त्यावर आढळून आला होता. यामध्ये स्कुटीला वाहनाने धडक दिल्यासारखा अपघात झाल्याचे भासविण्यात आले होते.तर यादरम्यान पत्नीच्या चेहर्‍यावर काहीच दुःख नसल्याचे दिसून आल्याने पोलिसांना घातपाताचा संशय आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मयत मंचक पवार यांच्या पत्नीनेच, पतीच्या नावाने काढलेला १ कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी, १० लाख रुपयांची दिली. त्यापैकी २ लाख रुपये इसार म्हणून मारेकर्‍यांना देऊन पती मंचक यांचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान याप्रकरणी आरोपी ३७ वर्षीय पत्नी, रा . वाला , ता . रेणापूर जि . लातूर , हमु . अंकुशनगर , बीड, श्रीकृष्ण सखाराम बागला २७, रा. काकडहिरा ता.बीड, सोमेश्वर वैजीनाथ गव्हाणे ४७, रा. पारगाव सिरस ता.बीड व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील पत्नीसह ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुपारी घेणार्‍या फरार दोघांचा तपास सुरू आहे.

Share This Article
Exit mobile version