– महसूल विभागाच्या रेतीतस्करांविरूद्धच्या कारवाईला सिंदखेडराजात अचानक ब्रेक; गौडबंगाल काय?
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – वाळूतस्करांविरोधात मध्यंतरी सिंदखेडराजा महसूल विभागाने सुरू केलेली धडक कारवाई आता अचानक व आश्चर्यकारकरित्या थांबली गेली असल्याचे दिसून येत आहे. तर वाळूतस्करांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला असून, जोरात वाळूतस्करी सुरू आहे. खास करून ताडशिवणी, राहेरी बुद्रूक व दुसरबीड, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा या गावांतून खुलेआम व रात्रंदिवस वाळूचे डंपर वाळूचोरी करताना दिसून येत आहेत. विशेष बाब म्हणजे, राहेरी बुद्रूक या गावातून पाताळगंगा व नागपूर डाकलाईन, भगवती मंदीर वरती असलेल्या शेतांमधून वाळूचे डंपर सोडण्यासाठी काही शेतकरी वाळूचोराकडून प्रतिडंपर ५०० रूपये घेत असल्याने काही शेतकर्यांचाही वाळूचोरांना पाठिंबा असल्याचा धक्कादायक प्रकार ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या पाहणीतून आढळून आला आहे. याबाबत सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीच्यावतीने लवकरच महसूल मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली जाणार असल्याचे या समितीचे अध्यक्ष अनिल दराडे यांनी दिली आहे.
या भागातील नदीपात्रांचा पंचनामा करण्यात येऊन, तसेच शेतरस्त्यांची पाहणी केल्यास मोठ्या प्रमाणात वाळूचोरीचा प्रकार उघडकीस येईल. त्यामुळे अवैध रेतीउपसा झालेल्या नदीपात्रांचे मोजमाप व पंचनामे करण्यात यावे, या मागणीसाठी लवकरच सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी व महसूलमंत्री यांच्याकडे निवेदन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राहेरी बुद्रूक येथील ट्रॅक्टरवाले आणि ताडशिवणी, लिगा, पिंपळगाव, कुडा, दुसरबीड, जळका येथील वाळूचोरी करणारे काही टिप्पर, जेसीबीवाले या वाळूतस्करीतून मालामाल होत असून, त्यांना या भागातील मंडल अधिकारी, तलाठी, सिंदखेडराजाचे तहसीलदार यांचा आशीर्वाद असल्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

