प्रतापराव जाधव पडणार!; सुबोध सावजींनी लावली पावणेतीन लाखांची पैज!

editor 2 Min Read
2 Min Read
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – माजी मंत्री सुबोध सावजी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सावजी यांनी त्यांच्या एका मुंबईतील मित्राशी पैज लावली आहे. मावळते खासदार प्रतापराव जाधव हे पडणार असल्याचे सावजींचे म्हणणे आहे. त्यानुसार, त्यांनी पैज लावली आहे. या पैजेनुसार प्रतापराव जिंकले तर सावजी हे त्यांच्या मित्राला 3.15 लाख रूपये देतील, आणि प्रतापराव पडले तर त्यांचा मित्र सावजींना 9.45 लाख रूपये देणार आहेत. याबाबतचा एक व्हिडिओ सावजी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. ही पैज चांगलीच चर्चेत आली आहे.

सुबोध सावजी यांनी सांगितले, की मी अनेक निवडणुका लढलो असून, जिंकलो किंवा पराभूत झालेलो आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदारानंतर मी जिल्हाभरातून माहिती घेतली असता, लोकांनी प्रतापराव जाधव यांना नाकारले असल्याचे कळले आहे. त्यानुसार, प्रतापरावांचे समर्थन करणार्‍या माझ्या एका मित्राने पत्रकारांसमोर मुंबईत माझ्याशी पैज लावली आहे. या पैजेनुसार प्रतापराव जाधव हे निवडून आले तर मी माझ्या मित्राला ३ लाख 15 हजार रूपये देईन. तर प्रतापराव जाधव हे पडले तर मात्र माझ्या मित्राने मला ९ लाख ४५ हजार रूपये द्यायचे आहे. आता बघू या माझा अनुभव व माहिती खरे होते की नाही, असे सुबोध सावजी यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, ही पैज लावल्यानंतर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी ती सोशल मीडियावर जाहीरसुद्धा करून टाकली. आता ही पैज बुलढाण्यात चांगलीच चर्चेत आली आहे. आता बुलढाण्याच्या निवडणुकीत महायुतीचे प्रतापराव जाधव बाजी मारणार की, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे विजयी होणार, की महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर विजयी गुलाल उधळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
————-

‘शिकार’ कुणाची झाली व कुणी केली?

Share This Article
Exit mobile version