– प्रचंड विक्रमी ठरली मेहकरतील सभा; प्रचार रॅलीही ठरली रेकॉर्डब्रेक!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – कमिशन राज, दादागिरी आणि एकाधिकारशाहीला जनता आता कंटाळली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आता पेटून उठली आहे. जनशक्तीविरुद्ध धनशक्ती असा हा सामना आहे. प्रत्येक घटकातून मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि आशीर्वाद पाहता या लढाईत विजय हा जनशक्तीचाच होणार आहे. आता एकजूट होऊन दादागिरी कमिशनराज संपवून जनसामान्यांचा आवाज बुलंद करू, असे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मेहकर येथील विराट सभेत केले. मावळते खासदार प्रतापराव जाधव यांच्या मेहकर मतदारसंघात घुसून तुपकर हे रेकॉर्डब्रेक सभा तर घेतच आहेत; परंतु अगदी घरात घुसून प्रतापरावांवर जहरी टीका करत आहेत. ठेकेदारी घरातच, देवस्थानं, मंदिरांच्या व इतरांच्या जमिनी हडपल्या, मेहकर मतदारसंघच नाही तर त्यांनी जिल्ह्याचा वाटोळं केलं, अशा शब्दांत तुपकरांनी प्रतापरावांवर जहाल शब्दांत टीकास्त्र डागणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही दबावाला न जुमानता लोकांची प्रचंड गर्दी तुपकरांच्या सभांना होत आहे.
मी कोणत्याही पदावर नसतांना केवळ आंदोलनाच्या बळावर शेतकर्यांना न्याय मिळवून दिला. तुमच्या सर्वांचे आशीर्वादाने जर संसदेत गेलो तर सोयाबीन-कापसाच्या भावासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संपूर्ण ताकदीने लढेल. ही लढाई एकटी रविकांत तुपकरची नाही तर ही लढाई आता सर्वसामान्य जनतेची आहे. रविकांत तुपकर खासदार म्हणजे प्रत्येक शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक आणि प्रत्येक फटका माणूस खासदार होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः निवडणुकीला उभे आहात असे समजून प्रचाराचे काम करा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले. आता प्रत्येकाच्या मनामनात परिवर्तनाचा विचार आहे, घरची चटणी भाकर खाऊन या जिल्ह्यात परिवर्तनाची क्रांती घडवून दाखवू, असा विश्वास यावेळी उपस्थित त्यांनी प्रचंड नारेबाजीच्या माध्यमातून रविकांत तुपकारांना दिला.

