– स्वाभिमानी दलित युवक, नागरिकांचाही आता तुपकरांना भरघोस पाठिंबा!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकरी नेते तथा लोकसभा निवडणुकीतील उमेदवार रविकांत तुपकर यांच्या पाठीशी शेतकरी चळवळीची सर्व ताकद अंतर्गत हेवेदावे विसरून उभी राहिली असतानाच; आता स्वाभिमानी दलित युवक व नागरिकांसह बहुजन समाजाची कणखर संघटना असलेल्या ऑल इंडिया पॅथर सेना संघटनेनेदेखील तुपकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ऑल इंडिया पँथर सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी रोखठोक भूमिका घेत, तुपकर यांनाच विजयी करण्याचे आवाहन दलित-बहुजन समाजाला केलेले आहे.
याबाबत पाठिंब्याचे पत्र केदार यांनी तुपकरांना दिले असून, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी संवाद साधताना, रविकांत तुपकरांचा विजय सुकर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे, असे जाहीर आवाहन दीपक केदार यांनी दलित-बहुजन समाजासह त्यांच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांनाकेलेले आहे. यापूर्वी शिंदे सेनेचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी मेहकर तालुक्यातील साबरा येथील ग्रामपंचायतीच्या दलित समाजातील सदस्याला अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला असता, दीपकभाई केदार यांनी साबरा गावात जाऊन दलित बांधवांना धीर देत, पीडित असलेले साबरा येथील ग्रामपंचायतीचे सदस्य गजानन वानखेडे यांना आधार व संरक्षण दिले होते. तसेच, आ. रायमुलकर यांना जाहीर भाषणातून इशारा दिला होता. केदार हे आक्रमक नेते असून, दलित बांधवांत व खास करून तरूणवर्गात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यांच्या पाठिंब्याने तुपकर यांच्या लढ्याला आता हजार हत्तीचे बळ प्राप्त झालेले आहे.
————-

