तुपकरांचेही महामानवाला अभिवादन, बुलढाण्यातील मिरवणुकीत धरला ठेका!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती १४ एप्रिलरोजी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. रॅली मिरवणुकांसह विविध कार्यक्रमानी जिल्हा दणाणून सोडला होता. बुलढाणा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये आंबेडकरी अनुयायांसह विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी चांगलाच ठेका धरला होता.
खामगाव येथे नगरपालिका मैदानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन सभेचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष दादाराव हेलोडे, जिल्हा सरचिटणीस बी. के. हराळे, भारिप-बमसंनेते अशोक सोनोने, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, संघपाल जाधव, जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे यांच्यासह आंबेडकरी अनुयायी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहरातून भव्य मिरवणूक करण्यात आली. यामध्ये शेतकरी नेते रविकांत यांनीही सहभाग नोंदविला. नांदुरा येथे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मेहकर येथे स्थानिक वाटिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, भाई कैलास सुगंधाने, शैलेश गावस्कर, जितू अडेलकरसह मान्यवरांनी अभिवादन केले.

