प्रेमात अडसर ठरणार्‍याचा गाडीखाली चिरडून काटा काढला!

editor 2 Min Read
2 Min Read
पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – प्रेमात अडसर ठरणार्‍या एकाच्या अंगावर गाडी घालून त्याचा गाडीखाली चिरडून खून केल्याप्रकरणी जुन्नर येथील प्रियकर व प्रेयसीला नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची (दि.१६) पोलिस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक सानील धनवे यांनी दिली. प्रियकर अभिजित जालिंदर सोनवणे (वय २४, रा. डिंगोरे, ता. जुन्नर) व प्रेयसी जेबा इरफान इनामदार (वय ३२, रा. कसाब आळी, जुन्नर) यांच्यावर भादंवि ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला गेला आहे. या घटनेत साबीर शफिक बेपारी कुरेशी (वय ४५ रा. मनसुबा पेठ, कसाबाई, जुन्नर) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची फिर्याद माजिद बेपारी यांनी दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विवाहित असलेला साबीर बेपारी कुरेशी याने ६ महिन्यांपूर्वी जेबा हिला प्रपोज केले होते, मात्र जेबा हिने साबीरला नकार दिला होता. यानंतर अभिजित सोनवणे व जेबा इनामदार यांच्यामध्ये काही महिन्यांपासून प्रेमसंबंध सुरू होते. ११ एप्रिलला रमजाननिमित्त अभिजित हा जुन्नर येथे जेबा हिच्या घरी आला होता. तेव्हा साबीर व अभिजितमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. १२ एप्रिलला साबीर हा नारायणगाव येथे पुणे-नाशिक महार्गावर हॉटेल अयोध्याजवळ उभा असल्याची माहिती अभिजित सोनवणेला जेबाने मोबाइलवरून दिली होती. अभिजित सोनावणे याने जेबा इनामदार हिच्यासोबत संगनमत करून प्रेमात अडसर ठरणार्‍या साबीर शफिक बेपारी याचा काटा काढण्याचे ठरविले. शुक्रवार (दि. १२) नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गावर असणार्‍या अयोध्या हॉटेलसमोर अभिजित सोनावणे यांच्या मालकीची कार ही साबीर बेपारी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर घालून त्यांना ठार मारले. हा प्रकार सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला आहे. गाडी रिव्हर्स घेत असल्याचा बनाव करीत साबीर याना ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावर गाडी घालून मारले असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या घटनेचा अधिक तपास जुन्नर पोलिस करत आहेत.

Share This Article
Exit mobile version