खासदार प्रतापराव जाधवांसह १२ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली!

editor 5 Min Read
5 Min Read
  1.  शिवसेनेत आता उभी फूट; खासदारांचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवणार
     उद्या दिल्लीत घडणार मोठ्या घडामोडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत
  2.  ठाकरे गटाचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र; मूळ शिवसेना आमचीच, ठाकरे गटानं केला दावा
  3.  मुख्यमंत्री आणि शिंदे गटाची आज रात्री बैठक; दिल्लीत जाताच खासदारांची घेणार बैठक; सर्व खासदार असणार बैठकीला उपस्थित
  4.  उद्या सकाळी लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार

मुंबई/नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली कट्टर हिंदुत्ववादी संघटना शिवसेना आता उभी फुटली आहे. बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या समर्थक आमदारांची व खासदारांची बैठक घेतली. या बैठकीला ४० आमदारांसह १२ खासदारांनी उपस्थिती लावली. हे खासदार ऑनलाईन हजर होते, असे सांगण्यात आले. लोकसभेतील खासदारांचा स्वतंत्र गट निर्माण केला जाणार असून, या गटाला लोकसभेच्या अध्यक्षांची मान्यता घेतली जाणार आहे. राहुल शेवाळे यांना या गटाचे पक्षप्रतोद म्हणून नियुक्त केले जाणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी दिल्लीत पोहोचत असून, राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. बुधवारी शिवसेना व शिंदे गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. तत्पूर्वीच खरी शिवसेना आपणच आहोत, हे दाखवण्यात शिंदे गटाला यश येत असल्याचे चिन्ह आहेत. विशेष बाब म्हणजे, कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटासोबत गेले असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी, त्यांचे दोन राजकीय शिष्य मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर व बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड हे शिंदे गटात गेलेले आहेत. त्यानंतर आता प्रतापराव जाधव यांनीही ‘मातोश्री’ सोडल्याचे स्पष्ट होत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद पदावरून पायउतार होण्यास भाग पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता ठाकरे यांना संघटनात्मक आव्हान दिले आहे. शिंदे गटाने सोमवारी बैठक घेऊन एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून निवड केली. हे करताना शिवसेना पक्षप्रमुखपदाबाबत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याशिवाय, शिवसेनेची जुनी कार्यकारिणी रद्द करून नव्या नेमणुका करण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. शिंदेंसह आमदारांच्या अपात्रतेच्या नोटिशीवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आपला पक्ष हीच खरी शिवसेना संघटना आहे हे दाखवून देण्यासाठी शिंदे यांनी ही खेळी खेळल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिंदे गटाचे ४० आमदार, अपक्ष आमदार यांची बैठक झाली. शिवाय, १२ खासदारांनीही या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली, असे सांगण्यात आले. यामध्ये सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, धैर्यशील माने, कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांचा समावेश होता. शिवसेनेचे हे १२ खासदार उद्या लोकसभेमध्ये वेगळा गट स्थापन केल्याचे पत्र देणार आहेत, तसेच राहुल शेवाळे यांना प्रतोद म्हणून निवडण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे, खासदारांच्या या घडामोडीची माहिती मिळताच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही दिल्लीत बैठक घेतली. राऊत यांच्या घरी झालेल्या बैठकीला विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर हे पाच लोकसभेचे खासदार तर संजय राऊत, अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी हे राज्यसभेचे खासदार उपस्थित होते. गजानन किर्तीकर हे दिल्लीत नाहीत, पण ते आमच्यासोबत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. गजानन किर्तीकर यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना निधी वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर जाहीर कार्यक्रमात टीका केली होती. तेव्हापासून किर्तीकर नाराज असल्याची चर्चा आहे.

‘मातोश्री’पासून दूर गेलेले खासदार!
१. श्रीकांत शिंदे – कल्याण
२. राहुल शेवाळे – दक्षिण मध्य मुंबई
३. हेमंत पाटील – हिंगोली
४. प्रतापराव जाधव – बुलडाणा
५. कृपाल तुमाणे – रामटेक
६. भावना गवळी – यवतमाळ-वाशिम
७. श्रीरंग बारणे – मावळ
८. संजय मंडलिक – कोल्हापूर
९. धैर्यशील माने – हातकणंगले
१०. सदाशिव लोखंडे – शिर्डी
११. हेमंत गोडसे – नाशिक
१२. राजेंद्र गावित – पालघर

दरम्यान, दोन दिवसांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झालेत. ते मंगळवार दिवसभर दिल्लीत थांबणार असून, रात्री उशिरा मुंबईत येणार आहेत. या भेटीत खासदारांच्या गटाला मान्यता घेणे, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या रणनीतीवर चर्चा करणे, तसेच भाजपच्या वरिष्ठांशी भेट घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा करणे, आदी कामे ते करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
—————–

Share This Article
Exit mobile version