बुलडाणा (राजेंद्र काळे) :-राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीसाठी मुंबईत गेलेल्या शिंदे गटांच्या ४० आमदारांची, मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरु असतांना..त्या बैठकीत दिल्लीहून सेनेचे १२ खासदार ऑनलाईन उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यात बुलडाण्याचे सेना खासदार प्रतापराव जाधव यांचा समावेश होता. त्यामुळे जिल्ह्यातील २ आमदारांच्या पाठोपाठ शिवसेना खा.प्रतापराव जाधव हे सुध्दा शिंदे गटाच्या उंबरठ्यावर असून केवळ अधिकृतरित्या पाऊल टाकणे तेवढेच बाकी आहे!
ना.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार सोबत घेतल्यानंतर, खासदारांच्या येण्यासाठी ते प्रयत्नशील होते. ११ खासदार त्यांच्या संपर्कातही होते. परंतु दोन तृतीयांश आकडा गाठण्यासाठी एका खासदाराची गरज होती. जेंव्हा कोल्हापूरचे खासदार शिंदे गटात यायला तयार झाले, तेंव्हा आज सोमवार १८ जुलै रोजी या १२ खासदारांनी शिंदे गटाने आयोजीत केलेल्या बैठकीत ऑनलाईन हजेरी लावली.
मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे दिल्लीला पोहचल्यावर, या १२ खासदारांचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्या जाईल.. तेंव्हा ते शिंदे गटात खऱ्या अर्थाने गेलेले असतील. ही तांत्रिक बाब सोडलीतर, प्रतापराव जाधव हे सुध्दा आता मानसिकदृष्ट्या शिंदे गटात पोहचल्याची चर्चा आहे. प्रतापराव जाधव हे केवळ खासदारच नसून बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचा जिल्हाभर शिवसेना पदाधिकाऱ्यांशी असलेला संपर्क पाहता, त्यांचेसोबत शिवसेनेत कोण-कोण जाणार? की पुर्णच शिवसेना ते शिंदे गटात घेवून जाणार?? हे लवकरच कळेल. कारण आधीच डॉ.संजय रायमुलकर व संजय गायकवाडसह माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर शिंदे गटात गेले आहेत. ३ जिल्हाप्रमुख शिवसेनेत असून, सहसंपर्क प्रमुख, विभागप्रमुख व तालुकाप्रमुख..अशी पदाधिकाऱ्यांची साखळी असून त्यापैकी किती खा. प्रतापरावांसोबत जाणार? लवकरच समजेल. दरम्यान, या पदाधिकाऱ्यांशी प्रतापरावांनी संपर्क सुरु केल्याची माहिती असून त्यांच्या मन परिवर्तनासाठी तन-मन-धनाने प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.
▪️जिल्हाप्रमुख बुधवत यांचा उद्या फैसला?
दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत हे संपर्कप्रमुख प्रतापरावांसोबत शिंदे गटात जाणार की मूळ शिवसेनेत थांबणार? याचा फैसला मंगळवार १९ जुलै रोजी ते जाहीर करु शकतात. दुपारी १२ वाजता त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
▪️दरम्यान, आ.संजय रायमुलकर यांच्या सोशल मिडीयावरील पोस्टवर पुन्हा एकदा खा.प्रतापराव जाधव यांचा फोटो झळकला असल्याने ते शिंदे गटात जाणार, हे आता कुणाला सांगण्याची गरज उरली नाही.
▪️‘अभेद्य प्रतापगड’ या फेसबुक पेजवरचा कव्हर फोटोसुध्दा बदललेला असून त्यात आता एकटे प्रतापराव दिमाखात दिसत आहे.

