सिंदखेडराजा (अनिल दराडे) – महसूल विभागाने खडकपूर्णासह इतर नदीपात्रांतील वाळूचोरी रोखण्यासाठी धडक कारवायांचा सपाटा लावल्याने खवळलेल्या वाळूतस्करांनी महसूलचे हे अधिकारीच जीवे ठार मारण्याचे प्रयत्न चालवले आहेत. तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्यासह महसूलचे पथक अवैध वाळू उपसा करणार्या वाळूतस्करांवर धाड टाकून कारवाई करण्यासाठी निमगाव वायाळ शिवारातील खडकपूर्णा नदीपात्रात गेले असता, वाळूमाफियांनी तहसीलदारांसह या पथकाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या पथकाच्या अंगावर सरळ ट्रॅक्टर घालण्यात आले, परंतु सतर्कतेने हे पथक वाचले आहे. परवा रात्री साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांत अज्ञात ४० ते ५० हल्लेखोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
याप्रकरणी किनगावराजा पोलिस ठाण्यात अप. नं. ७२/२०२४ कलम ३५३, ३७९, ५०६, १४३, १४७, १४९ भादंवि सहकलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यातील ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ यातून सुरु असलेल्या रेतीमाफियांच्या कारवाया जगजाहीर झाल्या आहेत. आता हे प्रकार बंद होतात की काही दिवसांनी पुन्हा चालू होतात? याकडे खडकपूर्णा नदीच्या तीरावरील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. काल, २७ मार्च रोजी किनगावराजाचे ठाणेदार विनोद नरवाडे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तलाठी घरजाळे व ग्रामस्थ यांच्यासह सरपंचपती रामेश्वर चाटे हजर होते. महसूल पथकाला चिरडण्याचा प्रयत्न करून वाळूतस्करांनी धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
——–

