आळंदी / देहू (अर्जुन मेदनकर ) : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा त्रिशत्कोत्तरअमृत महोत्सव बीज सोहळा बुधवारी ( दि. २७ ) हरिनाम गजरात देहुत पार पडला. सोहळ्यास राज्यभरातून लाखो वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ! भेदाभेद भ्रम अमंगळ || असं म्हणत जगाला समता शांतीचा आणि विवेकाचा संदेश देणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे संत तुकाराम. संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्याच आख्यायिकेस अनुसरून तुकाराम बीज सोहळा परंपरेने साजरा करण्यात आला. सोहळ्यात पहाटे ३ वाजता काकाडा आरती, पहाटे ४ वाजता तुकाराम महाराजांच्या पादुकांना महापुजा अध्यक्ष व विक्ष्वस्त यांचे हस्ते श्री संत तुकाराम महाराज महापुजा झाली. पवमान अभिषेक झाल्यानंतर, सकाळी १० ते १२ दरम्यान ह. भ. प. बापू महाराज देहुकर यांची किर्तन सेवा झाली. त्यानंतर तुकाराम महाराजांचे पालखी प्रस्थान झाले. वैकुंठ मंदिरात आरती, प्रदक्षिणा घालून नांदुरकीच्या वृक्षाजवळ जमलेले लाखो वारकरी भाविकांनी एकाच वेळी पुष्पवृष्टिने सोहळा पार पडला.
बीज सोहळ्याचे प्रशासकीय नियोजन प्रांत हवेली संजय असवले, तहसीलदार जयराम देशमुख, देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, देहू देवस्थानचे वतीने संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांनी प्रभावी नियोजन करून भाविकांना सेवा सुविधा दिल्या. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांचे सुलभ दर्शन होईल अशी व्यवस्था केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. देहूला जत्रेचे स्वरूप आले होते. भाविकांनी दुतर्फ़ा असलेल्या दुकानातून प्रसाद खरेदीस गर्दी केली. देहू नगरपंचायतीने यावर्षीही भाविकांचे स्वागताची तसेच भाविकांना नागरी सेवा सुविधा देण्यास कंबर कसली. स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणी पुरवठा, विद्युत रोषणाई, सीसीटीव्ही यंत्रणा, जंतुनाशके फवारणी, पी. ए.सी. यंत्रणा विकसित केल्याने भाविकांना सूचना देण्यास उपयुक्त ठरल्याचे कनिष्ठ अभियंता संघपाल गायकवाड यांनी सांगितले. तुकाराम बीज महोत्सवात देहू येथे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व पोलिस मित्र वेल्फेअर असोशिएशन ऑफ इंडियाच्या तर्फे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात पोलीस मित्रानी सेवा रुजू केली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कोळी साहेब, सहाय्यक पोलिस आयुक्त कसबे साहेब, पोलिस निरीक्षक सुनील दहिफळे, पोलिस उपनिरीक्षक जमदाडे साहेब, पोलीस मित्र वेल्फेअरचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र जाधव, कमांडर किरण कोल्हे, सचिन घोंगडे, संदिप चोपडे, निलेश कापडणे, करण कव्हळे, सुरज शिंदे, कैवल्य टोंपे इतर पोलिस अधिकारी व कमांडर यांनी परिश्रम घेतले.

