– थरकाप उडवणारी घटना; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी व्यक्त केला शाेक
– राज्य सरकारकडून 10 लाख तर पंतप्रधान कार्यालयाकडून 2 लाखाची तातडीची मदत जाहीर
हेल्पलाईन क्रमांक : घटनास्थळी मदतीसाठी 09555899091
इंदूर (ब्रेकिंग महाराष्ट्र) – इंदूरहून अमळनेरकडे येणारी एसटी बस मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात, खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक खालगट पुलाचे कठडे तोडून तब्बल १०० फूट उंचीवरून नर्मदा नदीत कोसळली. या भीषण अपघातात १३ प्रवासी ठार झाले असून, त्यात चार महिलांसह एका लहान बाळाचा समावेश आहे. बसमध्ये ३० प्रवासी असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु, कुणीही जीवंत बाहेर येऊ शकले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्य परिवहन महामंडळाने तातडीने १० लाख तर पंतप्रधान कार्यालयाने दोन लाखाची मदत जाहीर केली आहे. बसचे टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.
बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 30 प्रवासी होते. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये 8 पुरुष, 4 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करत दु:ख व्यक्त केलं आहे. “ही घटना अत्यंत दु:खद असून ज्यांचा या घटनेत मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो,” असं मोदी यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत टि्वट केलं आहे. शोध आणि बचावकार्य वेगाने सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करुन सद्यपरिस्थितीची बाबत माहिती दिली.
एसटी महामंडळाने दिला हेल्पलाईन नंबर
सकाळी ही बस इंदूरहून निघाली होती. वाटेत खलघाटात ही बस नर्मदा नदीत कोसळली आहे. एम.एच. -40 – 9848 असा या बसचा क्रमांक आहे. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने 022/23023940 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे.

