– महायुतीत येणार तिसरा भिडू; राज ठाकरे नवी दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला; बैठकांचे सत्र सुरू!
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – घासाघीस करत अखेर महाविकास आघाड़ीच्या लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. यामध्ये शिवसेना (ठाकरे) २२, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्ष १० जागा लढणार असल्याचे सूत्रांचे म्हणने आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाड़ीला चार जागांचा प्रस्ताव दिल्याचीही सूत्रांची माहिती असून, सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बुलढाणा लोकसभेची जागा शिवसेना (ठाकरे) गटाचीच राहणार असल्याचे सूत्राने स्पष्ट केले. वंचित आघाडीला ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन, काँग्रेसच्या कोट्यातून एक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा जाणार असून, त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष आहे. आज संध्याकाळपर्यंत भूमिका कळवा, असे महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना कळविण्यात आल्याचेही सूत्राने स्पष्ट केले. दुसरीकडे, महायुतीच्या जागावाटपाचा तिढाही आजच सुटण्याची शक्यता असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक सुरू आहे. राज ठाकरे हेदेखील या बैठकीला असून, मनसेचीही महायुतीत एण्ट्री होण्याचे निश्चित मानले जात आहे.
महाविकास आघाडीकडे दोन फॉर्म्युले तयार!
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे जागावाटपाच्या फॉर्म्युलाचे दोन पर्याय तयार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ऐनवेळी महाविकास आघाडीत आली नाही, तर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला २२-१६-१० असा राहील, त्यानुसार ठाकरे गट २२, काँग्रेस १६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी दहा जागांवर लढण्याची शक्यता आहे. तसेच, वंचित महाविकास आघाडीत दाखल झाल्यास, २०-१५-९-४ हा जागावाटपाचा फॉर्म्युला राहील. त्या परिस्थिती ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १५, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नऊ आणि वंचितला चार जागा देण्यात येतील. वंचितला ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन, काँग्रेसच्या कोट्यातून एक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा देण्याची तयारी आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष आहे.
————-
राज ठाकरे दिल्लीत आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया..
“माझं शेड्युल्ड काय आहे अद्याप मला माहिती नाही, मला फक्त ‘या म्हणून’ सांगितलंय. आता दिल्लीत आलोय. पाहू !” pic.twitter.com/ms34MejMcE
— Ramraje Shinde (@ramraje_shinde) March 18, 2024

