शेतकरी हतबल, वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – तालुक्यातील मिसाळवाडी व परिसरात माकडांनी हैदोस घातला असून, शेतीपिके व फळबागांचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबत वनविभागाला कळवूनदेखील वनविभागाचे अधिकारी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकरीवर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिसाळवाडीचे उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी यासंदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या कानावर हा धक्कादायक प्रकार टाकला असून, तुपकर यांनी तातडीने उपवनसंरक्षकांना फोन लावून माकडांचा बंदोबस्त करून शेतकर्यांना दिलासा देण्याची सूचना केली आहे.
गावातील शेतकरी तसेच उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी या गंभीरप्रश्नी चिखली वनविभागाच्या अधिकार्यांना सांगितले असून, त्यांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे शेवटी वैतागलेल्या शेतकर्यांनी याबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर, त्यांनी तातडीने उपवनसंरक्षकांना फोन करून कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत. तसेच, शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणीही तुपकर यांनी वन अधिकारी यांच्याकडे केलेली आहे.
—-

