– लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता; राजकीय धुरिणांचे कान टवकारले!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता गर्दे सभागृहात निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर याच दिवशी रविकांत तुपकर यांच्या जामीनावरचा निकालदेखील जिल्हा सत्र न्यायालयात घोषित केला जाणार आहे. एकीकडे न्यायालयाच्या निकालाची उत्सुकता लागून आहे तर दुसरीकडे या निर्धार मेळाव्यात रविकांत तुपकर काय घोषणा करतात याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीला नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या प्रकरणाचा निकाल काहीही येऊ शकतो म्हणजे रविकांत तुपकर यांचा जामीन रद्द होऊन त्यांना तुरुंगात जावे लागू शकते किंवा मग त्यांची मुक्ततादेखील होऊ शकते. परंतु या निकालापूर्वी रविकांत तुपकर हे आपल्या समर्थकांशी संवाद साधणार आहेत. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता गर्दे सभागृहात बुथ प्रमुखांच्या निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. काहीही झाले तरी यावेळी लोकसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धार आता कार्यकर्त्यांनी केला आहे. या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासंदर्भात रविकांत तुपकर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे रविकांत तुपकर या मेळाव्यात काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. तर दुसरीकडे न्यायालयाचा निकाल काय लागतो याबाबतदेखील कमालीची उत्सुकता लागून आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार असून या दिवसाकडे सर्वांची नजर आहे. तर या निर्धार मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांनी केले आहे.

