चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली तालुक्याचे नवे तहसीलदार म्हणून संतोष काकडे यांनी आज (दि.5) पदभार स्वीकारला आहे. काकडे हे यापूर्वी मेहकर येथेदेखील तहसीलदार राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना बुलढाणा जिल्ह्याची चांगलीच माहिती व अभ्यास आहे. येथे येण्यापूर्वी ते अमरावती येथे तहसीलदार व नंतर विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत होते. त्यांच्या बनावट सहीने होणारा कोट्यवधी रूपयांचा जमीन घोटाळा त्यांनी उघडकीस आणल्याने ते अमरावती येथे चांगलेच गाजले होते. तसेच, अनेक गौण खनिज तस्करांवर त्यांनी कठोर कारवाईदेखील केलेली आहे. चिखली तालुक्यातील वाळूतस्करी रोखण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्यासमोर आहे.
श्रीनगर ते कन्याकुमारी हा टप्पा सायकलींगद्वारे पार करण्याचा विक्रमदेखील तहसीलदार संतोष काकडे यांच्या नावावर जमा आहे. 2023च्या मार्चमध्ये राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी व शांततेचा संदेश घेऊन हा प्रवास त्यांनी केला होता. फक्त सहा दिवस आणि 13 तासांत काकडे यांच्यासह चौघांनी 3 हजार 651 किलोमीटरचे अंतर सायकलींगद्वारे पार केले होते.

