– कुडाळ, सावंतवाडी, कणकवली येथे विविध मान्यवरांच्या भेटीगाठी; ‘अमृत’ योजनांचा प्रचार-प्रसार!
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) – खुल्या प्रवर्गातील परंतु ज्या आर्थिक दुर्बल घटकांना शासनाच्या इतर संस्था, विभाग अथवा महामंडळांकडून योजनांचा लाभ मिळत नाही, अशा घटकांसाठी राज्य सरकारने ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या स्वायत्त संस्थेची स्थापना केली असून, या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन ‘अमृत’ ही लोकचळवळ बनवावी, असे आवाहन ‘अमृत’ संस्थेच्या संचालिका अस्मिता बाजी यांनी केले. महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने पावशी (ता. कुडाळ) येथे आयोजित सिंधुब्रम्ह संमेलनाच्या व्यासपीठावरून ‘अमृत’ योजनांची माहिती देताना अस्मिता बाजी बोलत होत्या.
या ब्रम्ह संमेलनाच्या स्तोत्र पठण स्पर्धेचे उद्घाटनही याप्रसंगी अस्मिता बाजी यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमानंतर त्यांनी समाजातील विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना ‘अमृत’ योजनांबाबत सविस्तर माहिती दिली, व या योजनांचा प्रचार-प्रसार करावा, अशी विनंती केली. उद्योजक प्रदीप शेवडे, ब्राम्ह युवा मंचच्या कार्यकर्त्या श्रेया कुलकर्णी, जिल्हा कार्यकारिणी सदस्या आरती कार्लेकर, नीलेश सरजोशी, पंडित वसंतराव गाडगीळ, सुशील आमोणेकर आदींच्या भेटीगाठी याप्रसंगी पार पडल्या. पावशी, सावंतवाडी, कणकवली येथेदेखील विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेऊन अस्मिता बाजी यांनी ‘अमृत’च्या विविध योजनांची सविस्तर माहिती विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिली.

