– लग्नाच्या ‘बर्थडे’लाचा भाजप नेत्या स्वाती मोहोळ यांना ‘आक्रोश’ करण्याची वेळ!
पुणे (निमिष जोशी/अमित शिंदे) – पुण्यातील कोथरूडसारख्या उच्चभ्रू परिसरात गुंडगिरीच्या जोरावर दहशत माजविणार्या कुख्यात गुंड तथा भाजपच्या नेत्या स्वाती मोहोळ यांचा पती शरद मोहोळची आज (दि.०५) त्याच्या लग्नाच्या वाढदिवसीच कोथरूडमधील सुतारदरा परिसरात भरदुपारी दीड वाजेच्या सुमारास अगदी जवळून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याचाच सहकारी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर व इतर तिघांनी अगदी नियोजनपूर्वक हे हत्याकांड घडविले. गुंड मोहोळ हा दुचाकीवरून जात असताना भरवस्तीत त्याला अडवून गोळ्या घालण्यात आल्या. चार गोळ्या लागल्याने त्याला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोहोळ याच्या हत्याकांडानंतर कोथरूड परिसरात गँगवार पेटण्याची चिन्हे निर्माण झाली असून, मोहोळ याला ससूनमध्ये हलविण्यात आले असता, बाहेर तब्बल पाचशे ते सहाशे तरूणांना जमाव जमला होता. कोथरूड परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, हत्याकांडानंतर पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
गोळीबारच्या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा सुतारदर्यात दाखल झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यावरून आरोपींची ओळख पटवून आरोपींचा माग काढण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. दरम्यान, मोहोळ याच्या हत्येनंतर पुण्यात गँगवार उफळण्याची शक्यता निर्माण झाली असून, कोथरूडमध्ये तणाव आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरात कोणताही गँगवॉर होणार नाही. कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदाराने केलेली आहे. गुंड कोणताही असो त्याचा बंदोबस्त लावण्याचे काम हे सरकार करते. त्यामुळे गँगवॉर करण्याची हिंमत कोणताच गुंड करणार नाही, असे फडणवीस यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. पुण्यात असलेले मोहोळ आणि गजा मारणे या दोन टोळींमधील वैर सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे मारणे टोळीकडून कट रचला गेला तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.
शरद मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव याच्यावर जून २०१२ मध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कतील सिद्दीकी याचा येरवडा तुरुंगात गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून २०१९ मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. जानेवारी २०१० मध्ये गुंड किशोर मारणेच्या हत्येप्रकरणी शरद मोहोळचेही नाव होते. दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला व त्याच्या सहा साथीदारांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर २०२१ मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. तेव्हापासून तो जामिनावर बाहेर होता. पुण्यातील या दहशतीची अखेर आज समाप्ती झाली आहे.
—————

