– १२ जानेवारीच्या जिजाऊ जन्मोत्सवासाठी सिंदखेडराजानगरीत एकवटणार बहुजन समाज!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – गेल्या तीन दिवसांत कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला असून, त्यामुळे येत्या १२ जानेवारीरोजी साजरा होणार्या राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवावर तसेच हिवरा आश्रम येथील विवेकानंद जन्मोत्सवावर चिंतेचे सावट पसरलेले आहे. त्यातच पुरातत्व खात्याने मॉसाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळाची स्वच्छता व योग्य ती निगा न राखल्याने जिजाऊ मॉसाहेबांच्या वंशजांसह बहुजन समाजात संतापाची तीव्र लाट पसरली आहे.
दुसरीकडे, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा जिल्ह्यात झालेला शिरकाव पाहाता, जिल्ह्यातील विवेकानंद जन्मोत्सव, हिवरा आश्रम व जिजाऊ मॉसाहेबांचा जन्मोत्सव सिंदखेडराजा या मोठ्या कार्यक्रमांवर चिंतेचे सावट आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात १ जानेवारीला नव्या कोरोना व्हेरिएंटचा पहिला संसर्गित रुग्ण आढळून आला. आता नव्याने सात जणांना कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शिरपूर येथील ५० वर्षीय कोरोना संसर्गीत महिलेस स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. आतापर्यंत शेगाव येथे २, चिखली येथे १ (महिला) तर बुलढाणा शहर व तालुक्यातील एकूण ४ जणांना या कोरोनाची लागण झाली आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाने तातडीने रुग्ण तपासणींवर भर दिला आहे.
————

