– तुपकरांच्या आंदोलनानंतरही शेतकर्यांच्या पदरी निराशा!
– कापसाचे भाव सर्वाधिक नीचांकी पातळीवर; सोयाबीनने उत्पादनखर्चही काढला नाही!
– कापसाचे भाव सर्वाधिक नीचांकी पातळीवर; सोयाबीनने उत्पादनखर्चही काढला नाही!
बुलढाणा/मुंबई (बाळू वानखेडे) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या दरवर्षीच्या सोयाबीन व कापूस हंगामातील आंदोलनाला राज्य सरकार सकारात्मक प्रतिसाद देत आले आहे. परंतु, या हंगामात मात्र तुपकरांना कोणतेच श्रेय मिळू नये, यासाठी सरकारमधील एका गटाने तीव्र विरोध चालवल्याने बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, शेतकरी आत्महत्यांचा उद्रेक या भागात निर्माण होण्याची भीती आहे. केवळ राजकीय नतद्रष्टेपणातून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना या सरकारने मदतीपासून वंचित ठेवले असल्याची चर्चा सरकार पातळीवरून कानावर येत आहे. देशातील कापूस उत्पादनात यंदा आठ टक्के घट होणार असल्याचा ‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’चा दुसरा अहवाल जाहीर झाला असला तरी, ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या कापसाच्या नव्या हंगामात २९५ लाख कापूस उत्पादनाचा अंदाज ‘सीएआय’ने व्यक्त केला आहे. तथापि, कापसाचे भाव मात्र सर्वाधिक नीचांकी पातळीवर आले आहेत. साडेचार हजार रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी करण्यात येत असून, साडेसहा हजार रूपये क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे यावर्षी कापूस उत्पादक शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला असून, गेल्या पाच वर्षातील कापसाचा हा नीचांकी दर आहे.
ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या कापसाच्या नव्या हंगामात २९५ लाख कापूस उत्पादनाचा अंदाज ‘सीएआय’ने व्यक्त केला आहे. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. मागील हंगामातील शिल्लक साठा जवळपास २९ लाख गाठींचा आहे. यंदा आयात ७६ टक्क्यांनी वाढून २२ लाख टनांची होईल. म्हणजेच यंदा एकूण कापूसपुरवठा ३४६ लाख गाठींचा असेल, असे ‘सीएआय’ने म्हटले आहे. देशातील कापूस वापर गेल्या वर्षी इतकाच म्हणजेच ३११ लाख गाठींचा होईल. कापूस निर्यात १४ लाख गाठींवर स्थिरावेल. मागील हंगामातील कापूस निर्यात १५ लाख ५० हजार गाठींची झाली होती. मागील हंगामात देशात १२ लाख ५० हजार गाठी कापूस आयात झाला होता. हीच आयात यंदा २२ लाख गाठींवर पोहोचणार आहे. म्हणजेच आयातीत तब्बल ७६ टक्क्यांची वाढ होणार आहे. यापुढील काळात कापूस उत्पादनाविषयीचे चित्र स्पष्ट होईल. ‘सीएआय’ने आपल्या अंदाजात यंदा १४ लाख गाठी कापूस निर्यात होईल असे म्हटले आहे. मागील हंगामात देशातून १५ लाख ५० हजार गाठी कापूस निर्यात झाली होती.
हे सरकार कुणाची जिरवतेय?; तुपकरांची की कापूस उत्पादक शेतकर्यांची?
कापूस व सोयाबीनची नुकसान भरपाई देण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री धनंजय मुंडे हे अनुकूल आहेत. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्यांना ही नुकसान भरपाई दिली गेली नाही तर या भागात सद्या दररोज ज्या सहा शेतकरी आत्महत्या होत आहेत, त्या तीव्रतेने वाढण्याची भीती आहे. त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी फडणवीस व मुंडे हे अनुकूल असले तरी सत्तेतील एक गट शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा तीव्र द्वेष करतो. ही भरपाई शेतकर्यांना आताच दिली गेली तर त्याचे ़श्रेय तुपकरांना मिळेल, अशी या गटाला भीती वाटत असल्याची चर्चा कानावर येते आहे. त्यामुळे रविकांत तुपकरांची जिरवण्याच्या नादात कापूस उत्पादक शेतकर्यांचीच जिरवली जात असल्याचे दुर्देवी चित्र निर्माण झाले आहे. सद्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी हे प्रचंड आर्थिक अडचणीत असून, सरकारने तुपकरांची जिरवण्यापेक्षा या उद््ध्वस्त शेतकर्यांना सावरणे गरजेचे आहे.
—————-
—————-

