बंडखोरांचा जीव मंत्रिपदासाठी टांगणीला!

editor 5 Min Read
5 Min Read

– बुलडाण्यातून संजय कुटे, संजय रायमुलकर की भाजपच्या श्वेताताई महाले पाटील?
औरंगाबाद (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यात बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार तर अस्तित्वात आले. परंतु, आता मंत्रिमंडळ स्थापनेचा सर्वात मोठा आणि गहन पेच निर्माण झालेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून आमदार संदीपान भुमरे व संजय सिरसाठ यांना मंत्रिपद हवे आहे. तर शेजारच्या बुलडाणा जिल्ह्यातही तिघेजण मंत्रिपदासाठी दावेदार आहेत. राज्यातही बंडखोर आमदारांमध्ये अशीच स्थिती आहे. शिंदे गटाला १३ मंत्रिपदे मिळणार असून, त्यात कुणा कुणाला मंत्रिपद द्यावे? असा पेच मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर निर्माण झालेला आहे.
औरंगाबादचे बंडखोर शिवसेना आमदार संजय सिरसाठ यांनी आज मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आलो असल्याचे सिरसाठ यांच्या नगरसेवक मुलाने सांगितले असले तरी, आपल्या पदरात मंत्रिपद घेण्यासाठीच हे शक्तिप्रदर्शन असल्याची जोरदार चर्चा आहे. तब्बल १२ लक्झरी गाड्या आणि काही छोट्या गाड्या घेऊन आमदार सिरसाठ हे मुंबईत आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून पैठणचे आमदार संदीपान भुमरे हे सीनिअर असून, त्यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. तसा त्यांना शब्दही दिला गेला आहे. परंतु, सिरसाठ यांच्या दबावामुळे भुमरे यांचे मंत्रिपद जाते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, दोनच दिवसापूर्वी कळमनुरी (हिंगोली)चे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर आता सिरसाठ हे शक्तिप्रदर्शन करत आहेत. विशेष म्हणजे, खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी संध्याकाळी ५.३० वाजता संजय शिरसाठ यांच्यासाठी वेळ राखून ठेवली आहे.
तिकडे, शेजारच्या बुलडाणा जिल्ह्यात तर मंत्रिपदावरून कमालीचा सस्पेन्स निर्माण झालेला आहे. शिवसेनेचे सीनिअर बंडखोर आमदार डॉ. संजय रायमुलकर यांना मंत्रिपद देण्याची मागणी होत आहे. तर बुलडाण्यातून भाजपचे आमदार संजय कुटे किंवा श्वेताताई महाले पाटील यांना मंत्रिपद देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इच्छुक आहेत. श्वेताताई महाले या विदर्भातील भाजपच्या एकमेव महिला आमदार आहेत. त्यांना राजकीय ताकद देण्याची रा. स्व. संघाची रणनीती आहे. त्यामुळे डॉ. संजय रायमुलकर यांचे मंत्रिपद हुकते की काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. बुलडाण्यात मात्र संजय गायकवाड यांच्यासाठी कार्यकर्ते मंत्रिपद मागत आहेत. त्यांच्यासमोर नजीकच्या काळात पुन्हा राजकीय संकट निर्माण होण्याचीही शक्यता आहे. माजी आमदार विजयराज शिंदे हे स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतण्याची शक्यता वर्तवली जात असून, तसे झाले तर पुन्हा एकदा संजय गायकवाड व विजयराज शिंदे अशी लढत होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग शिंदे यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे.

आमदारांपाठोपाठ शिवसेना खासदारही स्वतंत्र गट तयार करणार?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आणखी एक झटका देण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या तयारीस एकनाथ शिंदे हे लागले आहेत. सद्या शिंदे गटासोबत शिवसेनेचे ४० आणि अपक्ष असे ५० आमदार आहेत. शिवसेना खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहितीही हाती आली आहे. काल रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी ही बैठक झाल्याचे समोर आले.

उद्धव ठाकरे निवडणुकांच्या कामाला लागले
एकीकडे शिवसेना फोडण्याचे जोरदार काम सुरु असताना तिकडे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. ठाकरे यांनी नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असून, मातोश्रीवर जिल्हाप्रमुख, पदाधिकार्‍यांच्या बैठका होत आहेत. जेथे नगरपरिषद, नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्या ठिकाणच्या पदाधिकार्‍यांना बैठकीसाठी बोलावले गेले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ठाकरे यांनी जोर लावला असून, राज्यातील ९२ नगरपरिषदा, चार नगरपालिकांसाठी ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना मैदानात उतरणार आहे. आज सकाळी ११.३० वाजल्यापासून मातोश्रीवर बैठक सुरु आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. ठाकरे यांनी शिंदे गटासोबत जे जे गेले आहेत, त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काही ठिकाणी नवीन पदाधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे.

राज्य सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की मारामार्‍या होतील. सत्तेचे भुकेले होते म्हणून ते ५० जण एकत्र आले. मुंबईत सुरु असलेले त्यांचे शक्तिप्रदर्शन फक्त मंत्रिपदासाठी आहे. आता ५० लोकांत फक्त १३ मंत्रिपदे दिली आहेत. तिकडे भाजपचे ११६ जण आहेत. मग ते काय यांच्यासाठी मंत्रिपदे सोडतील का? मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठी नाराजी निर्माण होईल. जे फुटलेत त्यांना पश्चाताप होईल.
– चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते, माजी खासदार

Share This Article
Exit mobile version