– टोलवसुली कर्मचार्यांची दिवाळी अंधारात, दोन महिन्यांपासून पगारच नाही!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – दररोज कोट्यवधी रूपयांची वसुली करणार्या समृद्धी महामार्गावरील टोल वसुली व मेन्टेनन्स करणार्या रोडवेज सोल्युशन कंपनीने तिच्या कर्मचार्यांना दोन महिन्यांपासून पगार व दिवाळी बोनस न दिल्याने संतप्त कर्मचार्यांनी आज (दि.१५) कामबंद आंदोलन करत, महामार्गावरील टोलदांडा वर करून वाहने सोडून दिली. तसेच, कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने या कर्मचार्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने कर्मचारीवर्गाने त्यांचे आंदोलन मागे घेतले व पुन्हा टोलवसुली सुरू झाली. आंदोलनाच्या काही तासाच्या कालावधीत कंपनीचे मात्र लाखो रूपयांचे नुकसान झाले. मेहकरजवळील फर्दापूर टोलनाक्यावर हा धक्कादायक प्रकार घडला.
नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग वाढत्या अपघाताने अगोदरच चर्चेत आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी टोलनाके बसविण्यात आले आहेत. असाच टोल नाका मेहकरजवळील फर्दापूर येथेही आहे. येथील कर्मचार्यांना गेल्या दोन महिन्यापासून पगार नाही. कर्मचार्यांनी आज कामबंद आंदोलन केल्यानंतर कंपनीने व्यवस्थापनाने या कर्मचार्यांना पगार देण्याबाबत ठोस आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेतल्याची माहिती कर्मचार्यांनी दिली.
—————-
—————-
