बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी अगदी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या स्टाईलने आंदोलन सुरू केले असून, आपल्या आंदोलनात तुपकरांसारखे धक्कातंत्र वापरले आहे. काल ते जळगाव जामोद येथील अन्नत्याग आंदोलनस्थळावरून अचानक गायब झाले. त्यानंतर त्यांनी आज व्हिडिओ व्हायरल करून पुढील ४८ तासांत नुकसानग्रस्तांना मदत द्या, अन्यथा अज्ञात ठिकाणी आत्मदहन करू, असा इशारा दिला आहे. डिक्करांच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकरी व प्रशासकीय अधिकार्यांना तुपकरांच्या आंदोलनाची आठवण झाली आहे. दरम्यान, पोलिस डिक्करांचा शोध घेत असल्याची माहिती हाती आली आहे.
प्रशांत डिक्कर हे मागच्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले होते. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने उपोषण मंडपातील विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यानंतर ते आता गायब झाल्यामुळे त्यांच्या पत्नी वंदना डिक्कर यांना अश्रू अनावर झाल्या आहेत. “परिसरातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. मागच्या १५ वर्षांपासून ते शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. पण रात्री ४ वाजल्यापासून ते गायब आहेत. त्यामुळे मी आता पोलिस स्टेशनला जात आहे. दोन दिवसांपासून त्यांचा फोन लागलेला नाही. शेवटचा फोन केला होता त्यावेळी त्यांची तब्येत चांगली असल्याचं सांगितलं होतं.” असं म्हणत त्या भावूक झाल्या होत्या.

