– कुणाशीही वाद दाखवून विषयाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न; पक्षनेतृत्वावरच तुपकरांचा आक्षेप!
मुंबई (पुरूषोत्तम सांगळे) – शेतकरी संघटनेचे संस्थापक व शेतकर्यांचे पंचप्राण म्हणून ओळखले जाणारे स्व. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतून फुटून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोट बांधणारे राजू शेट्टी यांच्यावर पुन्हा एकदा आपला बिनीचा शिलेदार गमाविण्याची वेळ आली आहे. संघटनेत दुसरे नेतृत्व मोठे होऊ द्यायचेच नाही, या छद्मी भूमिकेमुळेच त्यांच्यावर एकटे पडण्याची ही वेळ आली. त्यांनी संघटना तर दुबळी केलीच, पण राजकीय विश्वासदेखील गमाविला. आतापर्यंत सदाभाऊ खोत, शिवाजीराव माने यांच्यासारखे पोलादी नेते संघटनेतून बाहेर पडले. रघुनाथदादा पाटलांसारखे मासलीडर नेते त्यांच्यापासून दुरावले. परंतु, आता रविकांत तुपकरांनी राजू शेट्टींच्याच नेतृत्वाला आव्हान देत, संघटना ताब्यात घेतली आहे. राजू शेट्टी हे ‘हा स्थानिक दोन नेत्यांतील वाद’ असल्याचे भासवून विषयाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न करत असले तरी, वस्तुस्थिती तशी नाही. सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटना रविकांत तुपकर यांच्या बाजूने एकवटली असून, आजरोजी राजू शेट्टी हेच संघटनेत एकटे पडले आहेत. पहिल्यांदाच संघटना फुटण्याऐवजी नेतृत्वालाच ‘साईडलाईन’ होण्याची वेळ आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातच तुपकर यांना पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहाता, तुपकरांच्या आंदोलनाने राज्य सरकारदेखील हादरते. देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, नाना पटोले यासारखे नेते थेट तुपकरांशी चर्चा करतात, हीच बाब राजू शेट्टी यांना कदाचित खटकत असावी. कापूस, सोयाबीनला भाव व पीकविमाप्रश्नी तुपकरांनी घणाघाती आंदोलने केल्यानंतर राज्य सरकारने चर्चेसाठी रविकांत तुपकरांना बोलावले. या चर्चेत तुपकरांनी राजू शेट्टींना सोबत घेतले नाही, त्यामुळे त्यांचा ‘ईगो हर्ट’ झाला असावा; त्यामुळेच घाटाखालील युवकाला नेतृत्व म्हणून थोपविण्याचा व तुपकरांचे मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न त्यांनी चालविला असल्याची संघटनेत सद्या जोरदार चर्चा आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी थेट शेट्टी यांनाच आव्हान देत, संघटना ताब्यात घेतली आहे. वास्तविक पाहाता, तुपकरांच्या माध्यमातून भाजपला एक युवा, शेतकरी चळवळीचा चेहरा मिळेल म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस हे रविकांत तुपकरांनी विनाअट भाजपमध्ये यावे, यासाठी आग्रही आहेत. त्याअनुषंगाने फडणवीस आणि तुपकर यांच्यात चर्चेच्या अनेक फेरीदेखील झाल्या आहेत. भाजपकडून बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवारी मिळत असेल तरच भाजपात येतो, अशी भूमिका तुपकरांनी घेतल्यामुळे, व बुलढाण्याची जागा शिंदे गटाकडे असल्याने याबाबत अद्याप फडणवीसांनी त्यांना काही शब्द दिलेला नाही. म्हणून, तुपकरांचा भाजपप्रवेश रखडलेला आहे. उद्या ही चर्चा फलदायी झाली तर तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह भाजपसोबत जाऊ शकतात. शेतकरी संघटना फुटण्याचा एक मोठा इतिहास आहे. आणि, रविकांत तुपकर हे त्याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी संघटना फोडली नाही तर संघटनेच्या नेतृत्वालाच बाजूला सारून संघटना ताब्यात घेतली आहे. एका बाजूला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे शेतकरी प्रश्नावर हात घालत, आपला पक्ष महाराष्ट्रात वाढवण्याचा प्रयत्न करत असतानाच, राज्यातील सर्वात मोठी संघटना असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील दोन नेत्यांमध्ये सुरू असलेला हा वाद पाहाता, तुपकरांसारखा आक्रमक नेत्यावर ‘केसीआर’ही आपले दोरे घालण्याचा प्रयत्न करत आहेत. राजू शेट्टी व रविकांत तुपकरांमधील वाद वेळीच मिटला नाही तर, शेट्टी यांच्या हातातून संघटना तर जाईलच; पण राज्यात उरले सुरले राजकीय अस्तित्वदेखील धोक्यात येईल?
२००४ मध्ये शरद जोशी यांनी भाजपशी मिळतेजुळते घेतल्याने जातीयवादी शक्तीबरोबर घरोबा नको, या कारणाने राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना काढली. या संघटनेत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोतही होते. या दोघांना सर्जा-राजाची जोडी म्हणूनच अख्खा पश्चिम महाराष्ट्र ओळखत होता. त्यांच्या आंदोलनामुळेच उसदराचा प्रश्न राजकीय पटलावर अधिक प्रकर्षाने मांडला गेला, आणि ऊस उत्पादकांना दरहमीही मिळवता आली. दरम्यानच्या काळात रघुनाथदादा पाटील यांनी आपला लढा स्वतंत्रपणे सुरूच ठेवला होता. त्यांनी शरद जोशी आणि शेट्टी यांच्याशी फारकत घेऊन, शेतकरी चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शेट्टी यांनी भाजपशी युती केल्यानंतर खोत यांच्या रूपाने सत्तेत सहभागही घेतला. मात्र, २०१६ मध्ये महायुती शासनाच्या काळात खोत सत्तेच्या मांडवात रेंगाळल्याने आत्मक्लेश यात्रेच्या निमित्ताने खोत यांना संघटनेतून बाजूला करण्यात आले. त्यांनीही रयत क्रांती संघटनेच्या नावाने सवतासुभा मांडला असला तरी छातीवरचा शेतकरी संघटनेचा बिल्ला कायम ठेवला आहे. आता रविकांत तुपकरांनी तर ही संघटनाच ताब्यात घेऊन शेट्टींना बाजूला सारण्याची तयारी चालवली आहे. पेरते तेच उगवते, याचा अनुभव राजू शेट्टी सद्या घेत आहेत.
————

