– अपघात होऊन वीस दिवस उलटले तरी अद्याप ‘डीएनए’ रिपोर्टही प्राप्त नाही!
वर्धा/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता, या घटनेला आता वीस दिवस लोटले असतानादेखील डीएनए रिपोर्ट आला नाही. ट्रॅव्हल्स मालकावर गुन्हा दाखल झाला नाही, आणि मृतकांच्या कुटुंबातील लोकांना जाहीर करण्यात आलेली मदतदेखील मिळाली नाही, असे मुद्दे घेऊन वर्ध्यातील १४ मृतकांच्या कुटुंबीयांनी वर्ध्याच्या जिल्हाधिकार्यांची भेट घेत, तीव्र संताप व्यक्त केला आहे. यानिमित्ताने अपघातस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणा वांझोट्या ठरल्या आहेत. या भीषण अग्निकांडात हे सरकार कुणाला पाठीशी घालण्याचे काम करत आहे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
दरम्यान, वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुलढाणा प्रशासनाला याबाबत अधिकृत विचारणा करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. ट्रॅव्हल्स अपघाताचा तपास थंड बस्त्यात का आहे, तपासात असणारी कागदपत्रे पीडित कुटुंबातील व्यक्तीला वेळोवेळी कामी पडणार आहे, पण ही कागदपत्रे मिळण्यासाठीदेखील त्रास होत आहे. इन्शुरन्स कंपनीकडून इन्शुरन्स मिळण्यासाठी त्याचा वापर होणार आहे. त्यासाठीदेखील नामांकित वकिलाची आवश्यकता आहे, शासनाने शासकीय वकील मिळवून द्यावा, अशी मागणी यासंदर्भात वर्धा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना मृतकांचे कुटुंबीय दिनकर खेलकर, ओमप्रकाश गांडोळे, शिवराज शिंदे, मदन वंजारी, रामदास पोकडे, सपना कामडी, चंद्रशेखर मडावी आदी उपस्थित होते.
विदर्भातून विदर्भ ट्रॅव्हल्सच्या गाड्या अजूनही धावत आहे. त्या तपासण्यात येत आहे की नाही? ज्या मालकाची ही ट्रॅव्हल होती तो वाहतूक विभागाचा अधिकारी आहे, त्यामुळे तर त्याच्यावर करवाई टाळली जात नाही ना? अशी शंका या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यापुढे मांडली. या अपघाताला विदर्भ ट्रॅव्हल्सच्या चालकासह मालकदेखील दोषी आहे. त्याबाबतची अनेक तथ्ये समोर आली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली.
————-

