भरधाव टिप्परने दुचाकीला उडविले; पती-पत्नी जागीच ठार

editor 1 Min Read
1 Min Read

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – पाठीमागून भरधाव येणार्‍या टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार पती- पत्नीचा जागीचं मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना ३ जुलैच्या सकाळी ९ वाजेदरम्यान मेहकर तालुक्यातील जानेफळ- लोणी गवळी रस्त्यावरील लावणा येथे घडली.

सविस्तर असे, की देविदास भिवसन पवार (वय ५०), पत्नी इंदूबाई देविदास पवार (वय ४४) हे दुचाकीवरून एका नातेवाईकाच्या सावडण्याच्या कार्यक्रमासाठी विश्वी येथे जात होते. दरम्यान, जानेफळ – लोणीगवळी रस्त्यावरील लावणा गावाजवळ मागून भरधाव येणार्‍या टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघा पती-पत्नीचा जागीचं मृत्यू झाला. घटनेनंतर टिप्पर चालकाने तेथून पलायन केले. मात्र संतप्त नागरिकांनी टिप्पर फोडून रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताचं डोणगांव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत, टिप्पर ताब्यात घेतले असून, घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही प्रेतांना शव विच्छेदनासाठी मेहकर येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविले व नंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास डोणगांव पोलीस करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version