१२ खासदार उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सोडण्याच्या तयारीत!

editor 2 Min Read
2 Min Read

– मुख्यमंत्री शिंदे लवकरच पंतप्रधानांच्या भेटीला; मंत्रिमंडळ विस्तार, राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा होणार
– काँग्रेसने त्यांच्या ११ दांडीबहाद्दर आमदारांना पाठवल्या नोटिसा
– ठाण्यात ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक जोरदार झटका बसण्याची शक्यता राज्यात निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात येण्याची तयारी चालवली असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. तर दुसरीकडे, ठाणे महापालिकेतून ठाकरे गट संपला असून, तेथील ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे. या घडामोडींसह, विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहणार्‍या ११ आमदारांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यानुसार, दोघांच्या पातळीवर काही फार्म्युला तयार झाला असून, शिंदे यांच्या गटाला कमी मंत्रिपदे मिळत असल्याचे सांगण्यात येते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे हे आजच नवी दिल्लीला रवाना होणार होते. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार व राष्ट्रपती निवडणूक याबाबत ही चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते.
एकीकडे ही घडामोड सुरु असतानाच, दिल्लीत मात्र शिवसेनेच्या १२ खासदारांनी उद्धव ठाकरे यांचा गट सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जाण्याची तयारी चालवली आहे. शिंदे गटानेही हे खासदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी हे खासदार शिंदे गटात येऊ शकतात. या घडामोडींची भनक लागल्यानेच उद्धव ठाकरे यांनी लोकसभेतील आपला पक्षप्रतोद बदलला. वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्याऐवजी त्यांचे समर्थक राजन विचारे यांना पक्षप्रतोद बनविण्यात आले आहे.

काँग्रेसची ११ आमदारांना नोटीस
राज्य विधानसभेत एकनाथ शिंदे यांची बहुमत चाचणी सुरु असताना, विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर आढळून आले होते. या सर्व आमदारांना काँग्रेस पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती सुशीलकुमार शिंदे, जितेश अंतापुरकर, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, जिशान सिद्दीकी, धीरज विलासराव देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हम्बर्दे, शिरीष चौधरी यांचा समावेश आहे.

Share This Article
Exit mobile version