संजय रायमुलकरांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

editor 2 Min Read
2 Min Read

– महिनाअखेर मंत्रिमंडळ विस्तार; बच्चू कडूंना कॅबिनेट मंत्रिपद!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – अखेर राज्याच्या बहुप्रतीक्षित अशा मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला असून, शिवसेना (शिंदे) व भाजपचे मिळून प्रत्येकी सात आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यात बुलढाणा जिल्ह्यातून ज्येष्ठ आमदार डॉ. संजय रायमुलकर (मेहकर) यांची वर्णी लागणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय सूत्राने दिली आहे. या शिवाय, बच्चू कडू (अचलपूर) यांचादेखील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी समावेश होणार आहे.

खास सूत्राच्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला दिल्ली दरबारातून मंजुरी मिळाली आहे. शिवसेना (शिंदे) व भाजपचे प्रत्येकी सात आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेकडून अनिल बाबर, भरत गोगावले, संजय रायमूलकर आणि बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार असून, उर्वरित तिघांमध्ये संजय शिरसाट, योगेश कदम आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा असली तरी ही नावे तूर्त वेटिंगवर असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपच्या सात जणांची नावे गोपनीय ठेवण्यात येत असली तरी, जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी शक्यता आहे. परंतु, बुलढाण्यात दोघांना मंत्रिपद मिळेल का, हादेखील प्रश्न निर्माण झालेला आहे. सूत्राच्या माहितीनुसार, संभाव्य मंत्र्यांची यादी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी राजभवनावर गेलेली असून, शपथविधीची तारीख व वेळ ठरविणे तेवढे बाकी आहे. त्यामुळे, आज पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे वक्तव्य केले होते.


आ. रायमुलकरांवर अपात्रतेची टांगती तलवार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र करण्याबाबतचे प्रकरण आता विधानसभा अध्यक्षांच्या दालनात पोहोचलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहे. या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळालेला असून, या आमदारांच्या बाबतीत शिवसेनेचा (ठाकरे) व्हीप लागू राहणार असल्याने या १६ आमदारांसह संजय रायमुलकर यांच्यावरदेखील अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळाले तरी, अपात्रतेबाबत अध्यक्ष काय निर्णय देतात, आणि हा निर्णयही सर्वोच्च न्यायालय मान्य करते की नाही, यावर आ. संजय रायमुलकर यांच्या मंत्रिपदाचे भवितव्य टिकून राहणार आहे.
————

Share This Article
Exit mobile version