– फटाक्यांची आतषबाजी, टाळ्यांचा कडकडाट, घोषणांनी आसमंत दणाणला!
साकेगाव (संजयनाथा निकाळजे) – नव्यानेच बसविलेल्या साकेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसर सौंदर्यीकरणासाठी पाच लक्ष रुपये तर भविष्यात उभारण्यात येणार्या बुद्धविहारासाठी दहा ते पंधरा लक्ष रुपये देण्याचे आश्वासन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी दिले. तर त्याचे भूमिपूजन येणार्या १४ एप्रिल रोजी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तथागत बहुउद्देशीय संस्था साकेगाव यांच्यावतीने शासनाची रीतसर परवानगी घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार, दि. २० मे रोजी आ. महाले यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. तत्पूर्वी सकाळी समता सैनिक दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर भन्ते दीपंकर यांनी धम्म ध्वजारोहण करून धम्मध्वज गीत सादर केले. त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली.
अनावरण प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी, टाळ्यांचा कडकडाट, घोषणांचा आवाज निनादच होता. यावेळी उपरोक्त मान्यवरांचा तथागत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र निकाळजे, उपाध्यक्ष राहुल निकाळजे, सचिव श्रीकृष्ण निकाळजे, सहसचिव विजय निकाळजे, कोषाध्यक्ष पंजाबराव निकाळजे, सदस्य अशोक निकाळजे, प्रदीप निकाळजे, विष्णू निकाळजे, वसंता निकाळजे, यांचेसह गावकर्यांनी तथा महिला मंडळांनी स्वागत केले. यावेळी पुढे बोलताना आमदार श्वेता महाले म्हणाल्या की, संविधानाच्या माध्यमातून आज सर्वांना समान न्याय अधिकार मिळत आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचे कार्य हे अनमोल असून, संविधानामुळे मातृशक्ती सुद्धा प्रबळ बनली आहे. या ठिकाणी तथागत संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र निकाळजे आणि पदाधिकार्यांची चळवळ बघता त्यांनी बाबासाहेबांचा पुतळा उभारून एक महान कार्य करून दाखवले. त्यामुळे ते निश्चितच अभिनंदन पात्र ठरतात. नवीनच बसवलेल्या या पुतळ्याच्या सौंदर्य करण्यासाठी पाच लक्ष रुपये तर बुद्ध विहारासाठी दहा ते पंधरा लक्ष रुपये देण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजन १४ एप्रिल रोजी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रतापसिंह राजपूत, अर्जुन बोर्डे, बाळू भिसे, प्रशांत डोंगरदिवे, ज्योती अवसरमोल यांनी आपले विचार व्यक्त केले, प्रास्ताविक ग्रामसेवक सुभाष वीर यांनी केले तर शेवटी सर्वांचे आभार तथागत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र निकाळजे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी समता सैनिक दल पदाधिकारी, धम्म उपासक, उपासिका यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

