– परीक्षेत मोठा गैरव्यवहार, शेकडो उमेदवारांनी घेतली गोरंट्याल यांची भेट
– महाघोटाळ्याची व्याप्ती किती जिल्ह्यात? एका उमेदवाराकडून घेतले १० ते १५ लाख?
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – राज्याच्या पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाला आहे. एकेक विद्यार्थ्याकडून १० ते १५ लाख रुपये घेतले गेले. यामध्ये मोठे रॅकेट काम करीत आहे, असा अतिशय गंभीर आरोप जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस भरतीची फेरपरीक्षा घेण्यात यावी. अन्यथा, उपोषणाला बसण्याचा इशारादेखील आ. गोरंट्याल यांनी दिला आहे. या आरोपामुळे राज्यात खळबळ उडाली असून, पोलिस भरतीची परीक्षा देणारे लाखो उमेदवार संतप्त झाले आहेत.
जालना शहर तसेच जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलांचे एक ते दीड गुणांमुळे नंबर गेला. या मुलांनी आता काय करावे? पोलीस भरती आणि परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी ५ ते ७ वर्षांपासून मैदानावर घाम गाळून शारीरिक तयारी केली होती. रात्रंदिवस संगणकावर प्रश्नपत्रिका सोडवून पोलीस भरतीच्या परीक्षेची तयारी केली होती. त्या मुलांचे सर्व श्रम वाया गेले. या विद्यार्थ्यांची सर्व तपश्चर्या वाया गेल्याचेही गोरंट्याल म्हणाले. हे सर्व मेरीटचे विद्यार्थी असून, त्यांना न्याय मिळायला पाहिजे. या भरती संदर्भात कुठल्या प्रकारचा समन्वय नाही आणि काय चालले तेच कळत नाही. यामुळे या प्रकाराची चौकशी व्हायलाच पाहिजे. जी पोलीस यंत्रणा किंवा एजेंसी ही परीक्षा घेत असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे? अशी मागणीदेखील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.
अग्निवीर भरतीबाबतही आ. गोरंट्याल यांनी गंभीर आरोप केले आहेत. सरकार नेमके काय करतेय तेच कळत नाही. हे भाजपचे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी गोरंट्याल यांनी केली आहे. आपण स्वतः सोमवारी उपोषणाला बसणार असून, झालेली परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी म्हटले.
——————-

