पुण्याच्या खडकवासला प्रकल्पात बुलढाणा जिल्ह्यातील दोन मुलींना जलसमाधी

editor 2 Min Read
2 Min Read

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – पुणे जवळील खडकवासला धरणात १५ मे रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील दोन मुली बुडाल्या. त्यातील ७ जणींना वाचविण्यात तेथील ग्रामस्थांना यश आले, परंतु दोन मुलींना जलसमाधी मिळाली. दुर्दैवाने ज्या दोन मुलींचा मृत्यू झाला त्यातील एक बुलढाणा शहरातील सोळंकी ले-आऊट मधील १३ वर्षीय ख़ुशी संजय खुर्दे आहे. तर दुसरी मुलगी शीतल भगवान टिटोरे वय १८ ही अंभोडा गावाजवळील झरी येथील राहणारी आहे. या दोन्ही मुलींच्या मृत्यूची वार्ता गावाकडे पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार गोर्‍हे खुर्द गावच्या हद्दीत ही घटना घडली.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, १५ मे २०२३ च्या सकाळी खडकवासला धरण क्षेत्रातील गोर्‍हे बुद्रुक येथील कलमाडी फार्म हाऊसच्या मागील बाजूस कपडे धुण्याकरिता आणि आंघोळी साठी या मुली आल्या होत्या. त्यावेळी या मुली पाण्यात उतरल्या. तर एक महिला कडेला आंघोळ करत होती. पाण्यात उतरलेल्या मुलींना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे त्या बुडू लागल्याचे दिसताच बाहेर थांबलेल्या दोन मुलींनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेथून काही अंतरावर स्मशानभूमी होती. त्यावेळी तिथे सावडण्याचा विधी सुरू होता. त्या मुलींचा आरडाओरड पाहून तेथील नागरिक पाण्यात बुडत असलेल्या मुलींच्या दिशेने धावत आले. त्यानंतर त्यातील काहीनी पाण्यात उडी मारून मुलींना सुखरूप बाहेर काढले. तर अन्य दोन मुलींचे मृतदेह तब्बल तासाभराने काढण्यात आले. यामध्ये ख़ुशी संजय खुर्दे (वय १३), शीतल भगवान टिटोरे (वय १८) या दोन मुलींचा मृत्यू झाला असून, पायल संतोष सावळे (वय १६), शीतल अशोक धामणे (वय १७), पल्लवी संजय लहाने (वय १०), राशी सुरेश मांडवे (वय ९), राखी संजय लहाने (वय १६) आणि ३२ वर्षीय मीना संजय लहाने या मुली बचावल्या आहेत. मृतक ख़ुशीचे वडील बुलडाणा नगरपरिषदेत वॉटरमन म्हणून कार्यरत आहेत. या घटनेतील जखमी मुलींवर जवळील रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. बुलडाण्यातील मुली नातेवाईकांच्या लग्न कार्यक्रमासाठी तसेच नाव ठेवण्याच्या कार्यक्रमासाठी खडकवासला येथे गेलेल्या होत्या, असे समजते.

Share This Article
Exit mobile version