चिखली (तालुका प्रतिनिधी) – कु. राधिका इंगळे या सहावर्षीय चिमुकलीच्या निर्घृण हत्येने समाजमन हादरले असून, चिखली शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात येऊन शहरात रॉली काढण्यात आली. राधिकाच्या मारेकर्यांना त्वरित जेरबंद करा, फासावर लटकवा, अशी मागणी नागरिकांनी केली.
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्व. राधिकाच्या हत्येचा तपास व हत्यार्यास फाशीच्या शिक्षेची मागणी, यासाठी चिखलीवासीयांनी एकत्रित येत संपूर्ण शहरातून रॅली काढून चिखली बंदचे आव्हान केले असता, चिखली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. स्व. राधिका इंगळे या चिमुकल्या मुलीची हत्या करणार्या नराधमास त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्याची सर्वपक्षीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्रित मागणी करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, चिखली तालुक्यातील रोहडा येथील तपोवन संस्थान परिसरातील एका लग्न समारंभातून १२ मेरोजी दुपारी ११ वाजतापासून हरवलेल्या राधिका इंगळे हिचा १३ मे रोजी दुपारी ३ वाजता तपोवन देवी परिसरात मृतदेह आढळला होता. प्रथम दर्शनी त्या बालिकेची निर्घृणपणे हत्या झाल्याचे दिसत आहे. या अंत्यत दुर्देवी घटनेबाबत चिखली परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. चिखलीवासीयांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे विनंती व्यक्त करण्यात आली की, प्रशासनाने याबाबत त्वरित कारवाई करून दोषी नराधमास त्वरीत अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी चिखलीकरांच्या वतीने स्थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार गावंडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसीलदार चिखली यांना करण्यात आली आहे.