– सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे संकेत
– १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत देणार निर्णय
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – शिवसेनेत बंडखोरी करून भारतीय जनता पक्षासोबत राज्यात सत्ता हस्तगत करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भवितव्याचा फैसला सर्वोच्च न्यायालय उद्या (दि.११) देणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तसे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा या निकालाने एकदाचा निकाल लागणार आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ निर्णय देणार असून, या घटनापीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम.आर.शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हेमा कोहली व न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा यांचा समावेश आहे. न्यायपीठाच्या उद्या निकालानंतर देशातील लोकशाही व्यवस्था टिकते, की ती उदध्वस्त होण्याच्या दिशेने न्यायसंस्थेचा शेवटचा किरणही फोल ठरतो, याकडे देशवासीयांच्या नजरा खिळलेल्या आहेत.
या प्रकरणी एकूण चार प्रमुख याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यातील पहिली याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची आहे, जी १६ आमदारांच्या निलंबनाला आव्हान देणारी आहे. दुसरी याचिका बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची मागणी करणारी उद्धव ठाकरे गटाची आहे. तिसरी याचिका उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांच्या निलंबनासंदर्भातील आहे. तर चौथी याचिका सुभाष देसाई यांची ३-४ जुलैचे विशेष अधिवेशन अवैध ठरवण्याची मागणी करणारी आहे. या चारही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे पाचसदस्यीय घटनापीठ आपला निकाल देणार आहे. घटनापीठाने फेब्रुवारी महिन्यात याबाबत घेतलेल्या सलग सुनावणीमध्ये वेगवेगळी मते आणि निरीक्षणे नोंदवली आहेत. तसेच महेश जेठमलानी, कपिल सिब्बल, हरीश साळवे, अभिषेक मनु सिंघवी, नीरज किशन कौल आणि मणिंदर कौल यासारख्या देशातील नामवंत आणि ज्येष्ठ वकिलांनी या प्रकरणी युक्तिवाद केला आहे. या निकालाकडे आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे हे तातडीने दिल्लीला तातडीने रवाना झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे व शिंदे गटाचे नेते दक्ष झाले असून, दिल्लीकडे ते प्रयाण करीत आहेत. ज्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय शिरसाट, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, रमेश बोरणारे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, महेश शिंदे, अनिल बाबर, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.
————

