– ट्रॅक्टरखाली पळाल्यामुळे वाचला बकरीमालकांचा जीव!
सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – साखरखेर्डा परिसरासह तालुक्याला सोसाट्याचा वारा, गारपिटीने झोडपून काढले. रविवारी सकाळी सात वाजेपासून सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत सुरू होता. या पावसात वीज पडून १४ बकर्या जागीच ठार झाल्या असून, दोन बकर्या गंभीर जखमी झालेल्या आहेत. तालुक्यातील रताळी येथे ही दुर्देवी घटना घडली. या बकर्यांचे मालक तातडीने ट्रॅक्टरखाली पळाल्यामुळे सुदैवाने त्यांचा जीव वाचला. या दुर्देवी घटनेत बकरीमालकाचे तब्बल दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
बकरीमालक भिकाजी जाधव हे विजेचा कडकडाट होताच शेजारील ट्रॅक्टरखाली पळाल्यामुळे त्यांचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताच, महसूल विभागाचे तलाठी, ग्रामसेवक, त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे जमादार अनील वाघ यांनीदेखील घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. यामध्ये भिकाजी जाधव यांच्या १४ बकर्या मरण पावल्या, व दोन बकर्या जखमी झालेल्या आहेत. जाधव यांचे तब्बल दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. तरी घटनेचा पंचनामा होऊन तातडीने शेळीमालकाला मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. या संपूर्ण घटनेची माहिती शिक्षक भानुदास लव्हाळे व अक्षय गोरे यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रला कळविली होती.
————-

