दरेगावात दरोडेखोरांचा धुमाकूळ, सहा लाखांचे दागिने लुटले!

editor 2 Min Read
2 Min Read

– रविवारी मध्यरात्रीची घटना, साखरखेर्डा परिसर हादरला

सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – येथून थोड्याच अंतरावर असलेल्या मौजे दरेगाव येथे गजानन सुरेश बंगाळे यांच्या घरावर काल रात्री सहा ते सात सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत, दरोडा टाकून बंदुकीचा धाक दाखवून सहा लाख दहा हजार रुपयांचे दागिने लूटून घरमालकाला संडासात कोंडून पळ काढल्याची घटना दिनांक ३ जुलैचे रात्री ११ चे सुमारास घडली. सदर घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांना अद्याप दरोडेखोर सापडले नसल्याची माहिती आहे.
या संदर्भात गजानन बंगाळे यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, माझे वडील सुरेश बंगाळे यांचे करोना काळात निधन झाले. त्या पाठोपाठ माझा भाऊ घनश्याम याचा अपघातात मृत्यू झाला. दि ३ जुलैचे रात्री १० चे सुमारास मी आम्ही सगळे शेतातील कामे पूर्ण करून जेवन करून झोपलो असताना, एक तासाने कुणीतरी दार वाजवले. दरम्यान मी दार उघडले असता सहा ते सात जण घरात घुसले व आम्हाला पैशाची मागणी करु लागले. लवकर पैसे आणा नाहीतर जीव मारू, असे धमकावून मारहाण करू लागले. काहींनी गावठी पिस्तूल व गुप्ते मानेवर लावली, तेव्हा आम्ही आमच्याकडे पैसे नाहीत पण जे आहे ते घेऊन जा, पण आम्हाला मारू नका, असे म्हणालो असता, त्यांनी नेकलेस, पाटल्या, मंगळसूत्रे, एकदाणी दोन मोबाईल, रोख पन्नास हजार असा एकूण सहा लाख दहा हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला व व मला संडासात हातपाय बांधून कोंडून ठेवले. दरम्यान बंगाळे यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली असता दुय्यम ठाणेदार सचिन कानडे, पो हे कॉ पोफळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरापर्यंत आरोपींचा शोध घेतला. सकाळी श्वान पथकाने देखील तपासणी केली असता, माग काढता आला नाही. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी घटनास्थळी भेट दिली असून, अनोळखी इसमाविरूध्द २९५ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्हीव्दारे दरोडेखोरांचा तपास सुरू असून गांवातील कुणीतरी एखादा यात सहभागी असू शकतो. त्यामुळेच दरोडेखोरांनी बरोबर संधी साधली. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जाईल.
-सचिन कानडे, दुय्यम ठाणेदार, पोलीस स्टेशन साखरखेर्डा

Share This Article
Exit mobile version