धर्माधिकारींच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्याला गालबोट; ८ जणांचा उष्माघाताने बळी, शेकडोंना त्रास!

editor 3 Min Read
3 Min Read

– कामोठेतील एमजीएम रूग्णालयात दाखल २५ जणांची प्रकृती गंभीर!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्य सरकारच्यावतीने दिला जाणारा महाराष्ट्र पुरस्कार वितरणाचा सोहळा तब्बल ८ ते १३ जणांचा बळी घेऊन गेला आहे. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत देण्यात आला. परंतु, खारघरमधील खुल्या मैदानात आणि कडकडीत उन्हात घेण्यात आलेल्या या सोहळ्यात सावलीची कोणतीही सोय नव्हती, तसेच लाखोंच्या संख्येने आलेल्या धर्माधिकारी यांच्या अनुयायींची कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे शेकडो अनुयायींना उष्माघाताचा फटका बसला असून, त्यात आतापर्यंत ८ ते १३ जणांचा बळी गेला आहे. तसेच, शेकडोंवर वैद्यकीय उपचार करण्यात येऊन त्यांना सोडून देण्यात आले. तसेच, कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात २५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी रूग्णालयात जाऊन रूग्णांची भेट घेतली असून, मृतकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. राज्याच्या सांस्कृतिक सोहळ्याला हा पुरस्कार वितरण सोहळा गालबोट लावून गेल्याने राज्यात तीव्र संताप तसेच हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कारानंतर श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे काहींना चक्कर आली असून जवळपास ३०० हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी बहुतेकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, त्यामध्ये सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अजूनही अनेक जण रुग्णालयात दाखल आहेत. त्यामध्ये अनेक जण गंभीर असल्याचीही माहिती मिळत आहे.

दरम्यान, आज सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झाला, अनेक लोक गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे, यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे ट्वीट काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोढे यांनी केले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मैदान खचाखच भरले होते. श्री सदस्य (धर्माधिकारी यांची संस्था) यांच्या अनुयायांना कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. त्यामुळे ते भरउन्हात कार्यक्रम पाहत होते. त्यांना शेडची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नव्हती.


ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर हा सोहळा दिमाखात पार पडला. मात्र, या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला असून, ८ ते १३ जणांवर मृत्यू ओढवला आहे. भव्यदिव्य कार्यक्रम भरउन्हात घेतल्याने काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली असून, त्यांनी रुग्णालयात जाऊन रूग्णांची विचारपूस केली. उष्माघाताचा त्रास होऊ लागताच अनेकांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अद्याप शेकडो रूग्ण उपचार घेत आहेत.
——————

Share This Article
Exit mobile version