रविकांत तुपकर म्हणजे, ‘गळ्यात तुळशीची माळ घालून बोकड कापणारा खाटीक’!

editor 5 Min Read
5 Min Read

– शेतकर्‍यांचे पैसे बुडविणार्‍या व्यापारी गाडेबंधूच्या बचावासाठी तुकारांची धडपड!

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – एकीकडे शेतकर्‍यांचा कैवारी असल्याचा आव आणायचा, आणि दुसरीकडे ज्या शेतकर्‍याने वर्षभर शेतात घाम गाळला, मशागत केली, त्या शेतकर्‍याचे पैसे बुडविणार्‍या व्यापारीबंधू गाडे याला पाठीशी घालून वाचवण्यासाठी रविकांत तुपकर धडपड करत आहेत. तुपकर म्हणजे गळ्यात तुळशी माळ घालून बोकड कापणारा खाटिक आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख यांनी केला. चिखली येथील विश्रामगृहात शनिवार, १५ एप्रिल रोजी शिंदे गटाच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती, या प्रसंगी त्यांनी तुपकर दाम्पत्यांवर गंभीर आरोप केले.

चिखली शहरातील व्यापारी संतोष मनोहर गाडे व अंकुश मनोहर गाडे यांनी शेतकर्‍यांचा जवळपास १० कोटी रुपयांचा माल विकत घेतला व २५० ते ३०० शेतकर्‍यांना मालाचे पैसे दिले नाही, शेतकर्‍यांचे १० कोटी रुपये बुडविले. गाडेबंधू भुसार मालाचा व्यवसाय करत असतांना जो शेतकर्‍यांचा भुसारमाल गाडेबंधूनी विकत घेतला व तो वेळेवर विकला, या मधील भावाची तफावत ही क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपयांची असू शकते. याचा अंदाज काढला तर त्यांचा खरेदी व विकलेल्या मालावरचा तोटा हा दहा ते पंधरा टक्यांपेक्षाही कमी गाडेबंधू जवळ असावा. किमान त्या रकमेच्या ७५ टक्के रक्कम शेतकर्‍यांना भेटायला पाहिजे. इतर खर्च दहा टक्के पकडला तर एकूण २५ टक्के तोटा धरला तरी शेतकरी हे ७५ टक्के रक्कमेवरसुध्दा समाधानी होतो. याउलट ही ७५ टक्के रक्कम शेतकर्‍यांना न देता त्यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मदत घेवून आणि रविकांत तुपकर यांच्या सुविज्ञ पत्नी अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर (सावजी) यांचे कायदेशीर मार्गदर्शन घेवून स्वतः नादार घोषित करण्यासाठी विद्यमान दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, बुलडाणा या न्यायालयात दि.५ एप्रिलरोजी अपिल दाखल केले आहे. सदरील न्यायालयाने जर त्यांना नादार घोषित केले तर शेतकर्‍यांना एक दमडीही देण्याचे काम राहणार नाही. परिणामी, शेतकर्‍यांना मिळणारे किमान साडेसात कोटींची रक्कम घशात घालण्याचा हा डाव आहे.

शेतकरी नेत्याचा शेतकर्‍यांना पीकविमा द्यायला कंपनीकडून उशीर झाला किंवा लवकर मिळावा म्हणून मुंबईमध्ये अरबी समुद्रात उडी मारुन घेतो, कधी आत्मदहन करण्यासाठी सोंग आणून आंदोलन करतात, व शेतकर्‍यांचा कैवारी असण्याचा आव आणतो. तर दुसरीकडे ज्या शेतकन्यांनी वर्षभर ज्या शेतीमध्ये घाम गाळला व आपल्या जवळचा पैसा लावून शेतीची मशागत केली, जीवापाड पिकांना जीव लावला, त्या शेतकर्‍यांचे कष्टाचे पैसे डुबविणान्या गाडेबंधू यांना त्यांच्याजवळील शेतकर्‍यांचा मालविक्री करुन आलेला पैसा स्वतःला नादार घोषित करुन कसा बुडवायचा याचे मार्गदर्शन करुन आपल्या वकील असणार्‍या पत्नीमार्फत न्यायालयात अपिल दाखल करून शेतकन्यांचे पैसे बुडविणार्‍या गाडेबंधुंचा बचाव करण्यासाठी व शेतकर्‍यांचे पैसे बुडविण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करायचा, आणि दुसरीकडे या शेतकरी नेत्याने पीडित शेतकर्‍यांना घेवून जिल्हाधिकारी बुलढाणा व इतर ठिकाणी पैसे वसूल करण्याचे निवेदन देण्याचे सोंग वठवायचे. तसेच, पत्नीमार्फत शेतकर्‍यांचे पैसे बुडविणार्‍या गाडेबंधूंना वाचविण्यासाठी न्यायालयात दावादेखील दाखल करायला लावायचा, संपूर्ण अन्यायग्रस्त शेतकर्‍यांमध्ये चिरीमारी करून शेतकर्‍यांची दिशाभूल केल्यामुळे शेतकर्‍यांच्या मनात एक संतापाची लाट तुपकरांविषयी पसरली आहे. म्हणून स्व-स्वार्थासाठी व खोट्या प्रसिध्दीसाठी शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे.
शेतकर्‍यांचे पैसे बुडविणारा व्यापारी गाडे हा रविकांत तुपकरांच्या संपर्कात होता, किंवा नाही हेसुध्दा तुपकरांनी सांगावे, आणि अनेक शेतकर्‍यांनी स्वतः तुपकर यांच्यासोबत गाडेबंधूंना पाहिले आहे, असा आरोपदेखील देशमुख यांनी केला आहे.शेतकर्‍यांमध्ये हीसुध्दा चर्चा आहे की, यात फार मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण करुन शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे हे षडयंत्र आहे. चिखली तालुका शिवसेनेची ही मागणी आहे की, ह्या सर्व शेतकर्‍यांचे पैसे मिळाले पाहिजेत. शिवसेना (शिंदे गट) शेतकर्‍यांच्या पाठीशी उभी असून, जोपर्यंत शेतकर्‍यांना न्याय भेटणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे. रवी तुपकर शेतकर्‍यांच्या टाळूवरील लोणी खाणारा असल्याने तो शेतकर्‍यांचा कळवळा असल्याची नौटंकी करत असतो. म्हणून तो गळ्यात तुळशीमाळ घालून बोकड कापणार्‍या खटकाप्रमाणे आहे, असा गंभीर आरोपही शिवाजी देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर केला आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख यांच्यासह तालुका प्रमुख गजानन मोरे, शहर प्रमुख विलास घोलप, युवा सेना उपजिल्हा प्रमुख रोहित खेडेकर, दत्ताभाऊ खरात, युवा सेना प्रमुख गोपीनाथ लहाने आदी उपस्थित होते.


दरम्यान, या आराेपांना उत्तर देण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे उद्या बुलढाण्यात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळाली असून, हे सर्व आराेप खाेटे असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. तसेच, गाडेबंधुंची वकिली किंवा त्यांना कायदेशीर सल्ला देण्याचे काेणतेही काम शर्वरीताई तुपकर यांनी वकील म्हणून केलेले नाही, असेही सांगण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version