चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील साकेगाव येथील बौध्द समाज बांधव गेल्या एका वर्षापासून राज्य सरकारकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी विविध कागदपत्राची पूर्तता करीत परवानगीची मागणी करीत होते. अखेर गावकर्यांच्या प्रयत्नास यश येवून जिल्हाधिकारी यांनी पुतळा बसण्याची परवानगी साकेगाववासीयांना दिली आहे. त्यामुळे गावकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी यांचा आदेश क्र.६७० दि.१३ एप्रिल रोजीच्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की, पुतळा शासन निर्णय दिनांक २ में २०१७ च्या आधीन राहून जितेंद्र केशवराव निकाळजे अध्यक्ष तथागत बहुउद्देशीय संस्था, साकेगांव यांचा दि.१४ मार्च २०२३ प्रस्ताव, जिल्हास्तरीय पुतळा समितीची सभा दिनांक १० एप्रिल २०२३ मध्ये प्रस्तावाच्या कागदपत्राची पडताळणी केली असता शासन निर्णय दिनांक २ मे २०१७ मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार साकेगांव, ता. चिखली, जि. बुलढाणा येथील ग्रामपंचायत मालमत्ता क्र.२७३/१ जागेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती स्मारक (पुतळा) उभारण्यास जिल्हास्तरीय पुतळा समितीने दिनांक १० एप्रिल २०२३ रोजीच्या बैठकीत सर्व समिती सदस्य यांनी सर्वानुमते सहमती दर्शविलेली आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक (पुतळा ) उभारण्याबाबत शासन निर्णयातील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी पुतळा समिती व संबंधित ग्रामपंचायत यांची राहील, असे आदेशाचे पत्र नुकतेच ग्रामपंचायत आणि संबंधित तथागत बहुउद्देशीय संस्थेला प्राप्त झाल्याने गावकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

