बुलढाणा (संजय निकाळजे)- भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती जिल्हाभरात १४ एप्रिल रोजी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील शहरासह गाव- खेड्यात आणि वाडी वस्त्यांमध्ये व्याख्यान, विविध स्पर्धा, प्रबोधनात्मक कार्यक्रम, रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शहर तथा ग्रामीण भागातील बुद्ध विहार तथा पुतळ्यांसमोर प्रत्येकाने मेणबत्ती लावून बाबासाहेबांना वंदन केले. सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी या महामानवाला अभिवादन मिरवणुकीमध्ये प्रचंड जनसागर उसळला आणि निळ्या पाखरांच्या जयभीम जयघोषाने आसमंत सुद्धा निनादला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाला १४ एप्रिलच्या पूर्व संध्येला रात्री १२ वाजता घड्याळाच्या ठोक्यापासूनच आरंभ झाला. विद्युत रोषणाई अन फटाक्याच्या नानाविध रंगछटांनी आकाश उजळून निघाले होते. रात्री १३ वाजता शहरासह ग्रामीण भागात बुद्धविहार पुतळा परिसरात हजाराच्या जन समुदायाने फटाक्यांची आतषबाजी केली. १४ एप्रिलची पहाट तर निळ्या पाखरांच्या प्रचंड गर्दीची ठरली. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर येऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी पहाटेपासून उपासक, उपासिका, अनुयायी लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे, संघटनांचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती पेटवून माथा ठेकवत अभिवादन केले. याप्रसंगी प्रत्येक ठिकाणचे बुद्ध विहार पुतळा परिसरात रोशनाई आणि झगमगटात दिसत होता. दुपारनंतर शहरात तथा ग्रामीण भागात सार्वजनिक मिरवणूक निघण्यास सुरुवात झाली. शुभ्र पांढरी वस्त्र परिधान करून उपासक- उपासिका मिरवणुकीत सहभागी झाले होते. तरुणाईच्या डोक्यावर निळे फेटे, गळ्यात निळा रुमाल आणि जयभीमचा जयघोष व डीजेवरील भीम गीत त्यामुळे मिरवणुका डोळ्याचे पारणे फेडत होता. डीजेच्या गाण्यावर तरुणाई ताल धरत होती. मिरवणुकीदरम्यान अनेक संघटना पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चहापाण्याची सुद्धा व्यवस्था केली होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीम जयंती सोहळा अभूतपूर्व ठरला.

