सुसंस्कृत मुख्यमंत्री अन् पालकमंत्रीही! अर्थात आता माजी..

editor 5 Min Read
5 Min Read

बुलडाणा ( राजेंद्र काळे) उगवत्या सुर्याला नमस्कार करण्याची जगाची रीत आहे. मावळतीकडे कोण बघणार? कारण नंतर अंधार होणार असतो. मात्र २९ जूनच्या रात्री ९.३० वाजता पदत्यागाची घोषणा केल्यानंतर, जो मुख्यमंत्र्याप्रती भावनिक प्रकाश पसरला होता.. तसा राजकीय उजेड महाराष्ट्रात प्रथमच झाला असावा. शालीन व सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून मराठी मनावर छाप सोडतांना, कोसळलेल्या संकटातही कमालीचा धिरोदात्तपणा उध्दव ठाकरे यांच्या वाणी अन् करणीत दिसला. ठाकरे मंत्रीमंडळात अनेक सुसंस्कृत चेहरे होते.. उदाहरण द्यायचेच तर बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, यशोमती ठाकूर, राजेश टोपे अन् आपले डॉ.राजेंद्र शिंगणे. टोपे-शिंगणे या मंत्री महोदयांनी तर कोरोना काळात झोकून देत केलेले काम, उभा महाराष्ट्र कधी विसरु शकत नाही. त्यामुळे केवळ ठाकरेंच्या जाण्याची सल नव्हतीतर, या सर्व मंत्र्यांच्या पायउतार होण्याचेही शल्य होते!_

 

राजकारण आहे शेवटी, या सारीपाटावर शह-प्रतिशहाचा खेळ बुध्दीबळालाही मागे टाकून जातो. मात्र बंड, त्यातही स्वकीयांचे असलेतर भळभळणाऱ्या जखमा सोडून जाते. शिवसेनेची अवस्थाही सध्या जखमी वाघासारखी आहे. या अवस्थेत कुठलीही डरकाळी न फोडता, ज्या शांततेत ठाकरे व मागोमाग त्यांचे सरकार गेले… हाही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला दखलपात्र क्षण आहे. प्रत्येक मंत्री त्याच संयमी मानसिकतेत दिसला. यशोमती ठाकूर यांनी मंत्रालयातील त्यांचा विभाग सोडतांना अधिकाऱ्यांपासून ते शिपायांपर्यंत औक्षण करुन घेतलेला भावनिक निरोप, तत्पूर्वी ‘वर्षा’ सोडतांना उध्दव ठाकरे व रश्मीताई ठाकरे यांनी दाखविलेला भावपूर्ण जिव्हाळा.. या घटना म्हणजे मानसिकतेतून व्यथीत न होता.. आलेल्या प्रसंगाला सामोरं कसं जावं? याचा तो एक आदर्श परिपाठच होता, एकूणच भारतीय राजकारणाला घालून दिलेला!

 

डॉ.राजेंद्र शिंगणे, हे त्याच परंपरेतील आदर्शवत नेतृत्व. सत्तेचा ‘माज’ नाही, अन् सत्ता गेल्याची ‘लाज’ नाही.. अशी त्यांची सामान्य वागणूक. वास्तविक २०१४ ते २०१९ ते राजकीय जिवनवासात होते. २०१९च्या लोकसभा निवडणूकीत त्यांना पुन्हा एकदा पराभवाचा फटका बसला, पण जिद्द व धीर न सोडता ६ महिन्यातच ते विधानसभेला सामोरे गेले अन् जिंकलेही. निवडून येताच पहाटेच्या शपथविधीवेळी असणारी त्यांची उपस्थिती, त्यांना धर्मसंकटात टाकत असतांनाही.. त्यातून ते सहीसलामत बाहेर पडले. नंतर मंत्रीपद मिळाले, अन्न व औषध खात्यासारखे मंत्रालय.. लगेच कोरोना आला, त्यातही ते भिडून राहिले. ऑक्सिजन, आयसीयू, रेमडिसिव्हीर.. अशा विविध प्रकारांचा ताण असतांनाही भान हरपू न देता त्यांनी काम केले. बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करतांनाही, त्यांनी पक्षापलीकडे जावून ते काम केले. एका शिवसेना पदाधिकाऱ्याने निधी वाटपात डावलल्याचा आरोप करायचा म्हणून त्यांच्यावर केला असलातरी, सेना-काँग्रेसतर सोडाच पण भाजपाच्या आमदारांशीही त्यांनी पक्षभेद केला नाही. आ.संजय गायकवाड यांच्या निवासस्थानी म्हणून त्यांची भेट स्नेहपूर्ण राहिली. कोरोनामुळे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीत कपात असतांनाही, त्यांचा प्रारुप आराखडा हा त्यातूनच मार्ग काढणाराच राहिला. तशी पहिली अडीच वर्ष नियोजनाची असतात, व नंतरची अंमलबजावणीची. आता तीच अडीच वर्ष हातातून गेली, अन् डॉ.शिंगणेंचे अन्न व औषध मंत्रीपद तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री पदही गेले. त्यामुळे आता पुन्हा नव्या येणाऱ्याचे ‘ये रे माझ्या मागल्या’ होईल.

 

सत्तेत असल्याची ‘जाणीव’ न होवू देणारे, आ.डॉ.राजेंद्र शिंगणे आता सत्तेत नसल्यामुळे ‘उणीव’ भासू देणार नाही.. अशी अपेक्षा त्यांची एकूणच कार्यशैली पाहून व्यक्त करायला हरकत नाही. तरी मुख्यमंत्र्यांसह एका सुसंस्कृत पालकमंत्र्यालाही मातृतिर्थ जिल्हा मुकला, तरी साहेब.. चलते चलते याद रखना..

कभी अलविदा ना कहेना!

 

आईये..

आपका इंतजार था!

मी पुन्हा येईल.. म्हणणारे पुन्हा मुख्य खुर्चीवर न येता.. ज्यांच्या येण्याची खबरबातही नव्हती, ते एकनाथ शिंदे त्या खुर्चीवर येवून बसले. जावू द्या, पण ‘काय ती झाडी, काय तो डोंगार अन् काय ती हाटील’ त्याआधी सुरतेवर स्वारी अन् येतांना गोव्याच्या समुद्र किनारी.. समदं एकदम ओक्केमधी. त्यात आपल्या बुलडाण्याचे एक दोन नाहीतर ३ संजुभाऊ.. भाजपाचे संजुभाऊ ‘मिस्टर इंडिया’ सारखे लुप्त झालेले, फक्त सुरतच्या विमानतळावर एकदा कॅमेऱ्याचा लाईट आल्यामुळे ते पळतांना दिसले तेवढेच!

 

बुलडाण्याचे संजुभाऊ फ्रंटवर मेहकरचे संजुभाऊ मागे- मागे. इकडे जिल्ह्यात ‘कोण गद्दार’ अन् ‘कोण खुद्दार?’ हेच कळत नव्हतं. वातावरण एकदम टाईट, सेनेअंतर्गत फाईट! एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, गोव्यात २ संजुभाऊंनी जल्लोष केला.. जिल्ह्यात फारसे फटाके फुटले नाही, कारण ‘खासदार साहेब कुणीकडे?’ हाच संभ्रम होता. चर्चांना उधाण येत होते. सुत्रांना काहीच घंटा माहित नव्हते.

 

जाऊ द्या, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याने आमचे संजुभाऊ जाम खुश असणार, अर्थात उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिल्यावर संजुभाऊ गायकवाड यांनी ५ तास स्वत:ला एका खोलीत कोंडून ठेवलं होतं म्हणे, इतकं दु:ख. आता दोन्ही-तिन्ही आमदार असणारे संजुभाऊ लवकरच मतदार संघात परत येतील.. त्यांचे स्वागत कसे होईल? हे पाहणेही तेवढेच आश्चर्यकारक ठरणार आहे. तोपर्यंत मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार झालातर, येतांना दोन तरी लाल दिवे सोबत घेऊन या, म्हणजे कमावली. बघुया काय-काय वाढून ठेवलं ते त्यांच्या ताटात. असो, तरी लवकर या.. आईये,

आपका इंतजार था!!

Share This Article
Exit mobile version