बहुमत चाचणीत शिंदे सरकार पास!

editor 3 Min Read
3 Min Read

– काँग्रेसच्या ९ आमदारांसह २१ आमदार आश्चर्यकारकरित्या गैरहजर
– अजित पवार बनले विरोधी पक्षनेते
– दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाचाही शिवसेनेला झटका, तातडीने सुनावणीस नकार

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – अगदी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. आज झालेल्या विश्वासमत दर्शक ठरावात, शिंदे सरकारच्या बाजूने १४४ पेक्षा जास्त म्हणजे, १६४ मते, तर विरोधात ९९ मते पडली. काँग्रेसच्या ९ आमदारांसह एकूण २१ आमदार आश्चर्यकारकरित्या गायब राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विधानसभेत एकूण २६६ आमदार होते, पैकी तिघांनी तठस्थ राहात, मतदानात भाग घेतला नाही. २६३ आमदारांनी मतदान केले, पैकी १६४ मते शिंदे सरकारला तर महाविकास आघाडीला ९९ मते पडली. तिकडे दिल्लीतही सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला झटका दिला. शिवसेनेचे गटनेते व मुख्य प्रतोद हटविण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, तातडीने सुनावणी घेण्यास न्यायपीठाने नकार दिला.
विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर अध्यक्षांनी आमदारांची शिरगणती केली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे २१ आमदार गैरहजर आढळले. त्यामध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप, अण्णा बनसोडे यांचा समावेश होता. त्यांना विधानसभेत यायला उशीर झाल्याने त्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर झालेल्या मतदानात शिंदे सरकारच्या बाजूने १६४ मते पडल्याचे दिसून आले. तर विरोधात ९९ मते पडली.
या मतदानादरम्यान पुन्हा एकदा विरोधकांनी गोंधळ घातला. आमदार प्रताप सरनाईक यांनी शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले असता, विरोधकांनी ईडी ईडी चे नारे लावले. उद्धव ठाकरे गटाच्या आणखी दोन आमदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचे दिसून आले. त्यांनी शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले. सुरुवातीला ध्वनीमताद्वारे मतदान घेण्याचे ठरले. परंतु, विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर मतदानाद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात आली. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. सरकारने विश्वासमत दर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले.

काँग्रेसचे गैरहजर राहिलेले आमदार
माजी मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कु. प्रणिती सुशीलकुमार शिंदे, जितेश अंतापुरकर, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, जिशांत सिद्दीकी, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू अवलमोहन हंबरडे, शिरीष चौधरी हे काँग्रेसचे आमदार गैरहजर होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आमदार संग्राम जगताप व इतर नऊ आमदार गैरहजर होते. पैकी, अनिल देशमुख व नवाब मलिक हे कारागृहात आहेत.

हाेय, हे ईडी सरकार आहे, एकनाथ आणि देवेंद्रने बनवलेले आहे : फडणवीस
विधानसभेत बहुमत परीक्षणासाठी मतदान सुरु असताना महाविकास आघाडीचे आमदार ईडी ईडी ओरडत होते. त्यावर, होय हे ईडी सरकार आहे. एकनाथ व देवेंद्रने बनवलेले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून, विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आम्ही सूडबुद्धीने वागणार नाही, असेही ते म्हणाले.

Share This Article
Exit mobile version