आठवडी बाजारातील दातृत्व दिशादर्शक-डॉ.पालवे

editor 2 Min Read
2 Min Read

बुलडाणा (✍️ राजेंद्र काळे) दर आठवड्याचा भाजीपाला आठवड्यातून एकदा ‘सेवासंकल्प’तील मनोरुग्णांसाठी गेल्या वर्षभरापासून पाठवल्या जात आहे. पूर्वी मनोरुग्णांना महिना-महिना दाळीच खाव्या लागायच्या, आता त्यांना पौष्टिक हिरवा भाजीपाला हा खाण्यासाठी मिळतो. ज्याला जे शक्य असेल, ते देण्याचा प्रयत्न प्रत्येकजण सेवासंकल्पसाठी करत असतो. त्यामुळे बुलडाणा येथील आठवडी बाजारातील हे दातृत्व दिशादर्शक असल्याच्या भावना डॉ.नंदकुमार पालवे यांनी व्यक्त केल्या.

 

बुलडाणा येथे महात्मा फुले आठवडी बाजार आहे, या बाजारात १५ च्या वर अडते व अनेक छोटे-मोठे भाजीपाला तथा फळांचे व्यापारी आहेत. अनेकांची तर हातावर पोट आहे, अशाही स्थितीत एखादी पन्नी का होईना तेवढा भाजीपाला हे लोक सेवासंकल्प प्रतिष्ठाणातील मनोरुग्णांसाठी देत असतात. त्यामुळे दर आठवड्याला एक छोटी गाडी भरुन आठवडाभरा साठीचा भाजीपाला सेवासंकल्पवर दिल्या जातो. हा उपक्रम २ जुलै २०२१ ला या आठवडी बाजारातील एक दातृत्वशील व्यक्तीमत्व विजय पातालबंसी यांच्या वाढदिवशी सुरु झाला. आज २ जुलै २०२२ ला या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने एक कृतज्ञता सोहळा आज आठवडी बाजारात करण्यात आला.

 

यावेळी प.पू.आशुतोष गिरी महाराज यांचे पूजन विजय पातालबंसी व त्यांच्या पत्नीने केले. अध्यक्षस्थानी कुणाल संजय गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार राजेंद्र काळे, गजेंद्र दांदडे, गजानन काटकर, मुन्ना बेगानी, मनोज यादव यांच्यासह डॉ.नंदकुमार व सौ.आरती पालवे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी आठवडी बाजारातून होत असलेल्या या समाज-सेवचे कौतुक केले. यावेळी आठवडी बाजारातील विश्वनाथ बिडवे, शेख अफसर शेख रज्जाक बागवान, शे.युनूस बागवान, राजेंद्र कोल्हे, अनिल भोपळे, ईश्वर वाघ, बबनराव दांदळे, संजय भराड, अनिल जगताप, मुकेश जयस्वाल, राजीव गोरे व सचिन गडाख या अडत्यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन पत्रकार रणजितसिंह राजपूत तर आभार प्रदर्शन विजय पातालबंसी यांनी केले. फळविक्रेते व भाजीविक्रेते यावेळी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version