मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या शक्तिपरीक्षा!

editor 2 Min Read
2 Min Read

विधानसभेत बहुमत सिद्ध करणार?

– ठाकरे यांच्या गटाच्या गटनेते व प्रतोदांची मान्यता रद्द! नव्या अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना झटका!!

मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – विधानसभा अध्यक्षांची निवडणूक बहुमताने जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोमवारी (दि.४) बहुमत सिद्ध करण्याची शक्तिपरीक्षा आहे. सेमी फायनल तर त्यांनी जिंकले आहेच, आता ते फायनलदेखील जिंकतील, अशी माहिती त्यांच्या गटातून देण्यात आली आहे. दुसरीकडे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेले अजय चौधरी यांची गटनेते पदाची आणि सुनील प्रभूंच्या मुख्य प्रतोदपदाची मान्यता रद्द करण्यात आली असून, त्या जागी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे  विधिमंडळ गटनेते व भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नव्या अध्यक्षांनी हा निर्णय दिला आहे. 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला भलेमोठे भगदाड पाडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. राज्यपालांनी त्यांना सोमवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यासाठी दोन दिवशीय विशेष अधिवेशनदेखील बोलावले गेले आहे. आज अध्यक्षांची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर हे १६४ मते घेऊन विजयी झाले, तर महाविकास आघाडीचे राजन साळवी यांना १०७ मते पडली. सोमवारच्या बहुमत सिद्धतेत शिंदे यांना हीच आकडेवारी गाठता येईल का, हा प्रश्न आहे.

१६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या मागणीबाबत सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेली आहे. समजा, जर हे १६ आमदार १२ तारखेला अपात्र ठरवले गेले आणि त्यांचे सदस्यत्व रद्द झाले तर आजच्या मतदानात शिंदे-फडणवीस यांच्याकडे जो १६४ मतांचा आकडा दिसला, तो नंतर १४८ इतका खाली येईल. तरीही बहुमताचा जादुई आकडा १४४ पाहाता, शिंदे सरकार विश्वासमत ठराव जिंकते. नंतरच्या कारवाईत जर ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने सर्वच्या सर्व म्हणजे ३९ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची कार्यवाही केली तर मात्र १६४ पैकी फक्त १२५ इतके संख्याबळ शिंदे-फडणवीस जोडीकडे उरते. तेव्हा मात्र शिंदे सरकार कोसळू शकते, असे राजकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केले तरी, त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम राहणार आहे. सोमवारचा विश्वासदर्शक ठराव, तूर्त तरी महाविकास आघाडी हारणार आहे, हे सुस्पष्ट आहे.

Share This Article
Exit mobile version