बुलढाणा (खास प्रतिनिधी) – येथील बुलढाणा जिल्हा चेस सर्कल, बुलढाणा अर्बन तथा सहकार विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने बुलडाण्यात फिडे मानांकन राज्यस्तरीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही १४ ते १६ एप्रिल दरम्यान सहकार विद्या मंदिर सभागृह येथे घेण्यात येणार असल्याची माहिती बुलडाणा अर्बनचे सीएमडी तथा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सदर स्पर्धा ही आठ फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार आहे. प्रत्येक फेरी ही ६० मिनिट ३० सेकंदाची असणार आहे. सदरची स्पर्धा स्विस लिग पध्दतीने घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता केले जाणार आहे तर बक्षीस वितरण १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता केले जाणार आहे. तसेच इतर महितीकरिता ९४०५७७७७८४ वर संपर्क साधावा. स्पर्धेचा लाभ जास्तीत जास्त खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
ग्रँडमास्टर करणार मार्गदर्शन
बुलडाण्यात घेण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी मार्गदर्शन व मुख्य आकर्षण म्हणून ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, ग्रँडमास्टर स्वप्निल धोपाडे हे असणार आहे. तर या स्पर्धेकरीता अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनचे सल्लागार अशोक जैन तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके, स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंच म्हणून कामगिरी केलेले प्रवीण ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यांना देखील आमंत्रित करण्यात आलेले आहे.
नॅशनल स्पर्धेसाठी होणार खेळाडूंची निवड
राज्यस्तरीय बुलढाणा येथे होत असलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची निवड ही नॅशनल स्पर्धेसाठी केली जाणार आहे. सदर स्पर्धा ही मे महिन्यात १ ते ९ मे दरम्यान पंजाब मध्ये घेतली जाणार आहे.

