चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – गेल्या तीन वर्षांपासून चिखली तहसीलदार पदावर कार्यरत असलेले डॉ. अजितकुमार येळे यांची प्रशासकीय बदली करण्यात आली, आणि लगेच नव्याने तहसीलदारपदी विराजमान झालेले सुरेश कव्हळे यांनी तहसीलदारपदाचा पदभार हाती घेताच, त्यांचा सत्कार ब्रेकिंग महाराष्ट्र परिवाराच्यावतीने तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्यावतीने नुकताच तहसील कार्यालयात करण्यात आला. याप्रसंगी गतिमान व लोकाभिमुख प्रशासन देऊन राज्य सरकारच्या योजनांचा सर्वसामान्यांना लाभ देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू, अशी ग्वाही नूतन तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ टीमला दिली.
अशा या कर्तव्यदक्ष अधिकार्याचा सत्कार ब्रेकिंग महाराष्ट्र परिवाराच्यावतीने जिल्हा विशेष प्रतिनिधी संजय निकाळजे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा दै. देशोन्नतीने वरिष्ठ पत्रकार प्रतापराव मोरे, पत्रकार उध्दव थुट्टे पाटील यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून केला. याप्रसंगी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना तहसीलदार कव्हळे म्हणाले, की लोकाभिमुख प्रशासन तसेच गतिमान प्रशासन ही काळाची गरज आहे. शासनाच्या योजना व सेवा लोकांना सहज सुलभ उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच, महसूल प्रशासनाचे कामकाज अधिक लोकाभिमुख कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करत आहोत. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकर्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
——————

